टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना यंदा बीसीसीआयकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल करण्याचा विचार सुरू असून, या बदलांमुळे रोहित आणि विराट यांचे डिमोशन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट स्ट्रक्चरमधील ‘A+’ कॅटेगरी पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआय लवकरच एक नवे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मॉडेल लागू करू शकते. या नव्या पद्धतीत A+ कॅटेगरी नसेल आणि फक्त A, B आणि C अशा तीनच कॅटेगरी ठेवल्या जातील. जर हा निर्णय अंमलात आला, तर सध्या A + कॅटेगरीत असलेले रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना डिमोशनला सामोरे जावे लागू शकते.
बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना थेट ग्रेड B मध्ये टाकले जाऊ शकते. रवींद्र जडेजालाही ग्रेड B मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ग्रेड A मध्ये ठेवले जाऊ शकते. म्हणजेच, सर्वात मोठा फटका रोहित आणि विराट यांना बसण्याची चिन्हे आहेत.
या बदलामागे मुख्य कारण अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची शिफारस आहे. निवड समितीने बीसीसीआयला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला असून, A प्लस कॅटेगरी (7 कोटी रुपये) रद्द करून फक्त तीन कॅटेगरी ठेवण्याची सूचना केली आहे. यामुळे सॅलरी स्ट्रक्चरमध्येही मोठे बदल होणार आहेत. याआधी A+ खेळाडूंना 7 कोटी, A ला 5 कोटी, B ला 3 कोटी आणि C ला 1 कोटी रुपये मिळत होते.
गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये जाहीर झालेल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये रोहित, विराट, जडेजा आणि बुमराह A+ कॅटेगरीचा भाग होते. आता मात्र बीसीसीआयचा हा नवा निर्णय प्रत्यक्षात आला, तर भारतीय क्रिकेटमधील सत्ताकेंद्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.





