नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. यासह या स्पर्धेचे पहिलेवाहिले विजेते होण्याचा मानही पटकावला. या सामन्यानंतर त्यांचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर निवृत्ती घेणार का, या चर्चेला उधाण आले होते.
अनेकांनी तर सामना संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभावेळीच ३७ वर्षीय टेलर निवृत्तीची घोषणा करेल, असा होरा बांधला होता. टेलरने चौकार मारत न्यूझीलंडचा विजय या सामन्यात सुनिश्चित केल्याने हा शेवट त्याच्या कारकिर्दीला अगदी साजेसा असेल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र टेलरने असे काही केले नाही. मात्र तरीही त्याच्या निवृत्तीची चर्चा काही संपलेली नाही. न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचे विश्वविजेते झाल्याने त्याने निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे, असा मतप्रवाह आहे. आता टेलरने स्वतः पुढे येऊन याविषयी आपले मत मांडले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाच्या वृत्तानुसार टेलरने त्याचा सध्या निवृत्ती घ्यायचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. टेलरच्या मते त्याच्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. टेलर म्हणाला, “माझे क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. मला अजून खूप काही शिकायची इच्छा आहे आणि अजून सुधारणा करण्याची इच्छा आहे. आत्ताच्या घडीला मला फक्त क्रिकेट खेळत राहायचे आहे. मग ते कुठल्याही स्तरावरील असेल तरी चालेल. जोपर्यंत शक्य असेल तोवर मी क्रिकेट खेळत राहील.”
पुढे तो म्हणाला, “एरवी साधारपणे न्यूझीलंडमध्ये खेळाडू ३४-३५ व्या वर्षी निवृत्त होतात. मी आता ३७ वर्षांचा झालो आहे. त्यामुळे मला आता कळाले आहे की ते का निवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर देखील तुम्ही तेच करू शकता जे तुम्ही आधी करत होतात. माझ्यामते मी स्थानिक क्रिकेट खेळू शकेल. पण सध्यातरी मला आपल्या देशाकडून खेळण्यात रस आहे.” टेलरने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तात्पुरता तरी त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर पडदा पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
भारताचे ब्रम्हास्त्र ठरतंय निकामी! इंग्लंडविरुद्ध बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूंना दिली जाऊ शकते संधी
WTC ची ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनल खेळविण्यात यावी का? गांगुली यांनी दिले ‘हे’ उत्तर
‘मी हरभजनला मारायला हॉटेलमध्ये गेलो मात्र…’, ‘त्या’ भांडणाबाबत अख्तरचा मोठा खुलासा