न्यूझीलंड विरुध्द इंग्लंडची दोन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपुष्टात आली. यातील पहिला लॉर्डसच्या मैदानावर झालेला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर त्यानंतर एजबस्टनच्या मैदानावर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांची मालिका देखील खिशात घातली.
या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने मोलाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात ८० धावांची खेळी करत न्यूझीलंडला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. याच खेळी दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत मैलाचा दगड गाठला. दिग्गज फलंदाजांना देखील त्याने यात मागे टाकला.
विराट कोहलीला टाकले मागे
रॉस टेलरने आपल्या ८० धावांच्या खेळी दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ७५०० धावांचा टप्पा पार केला. त्याने आत्तापर्यंत १०७ कसोटी सामन्यात ४५.७६च्या सरासरीने ७५०६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २९० आहे. यात त्याने आजवर १९ शतके आणि ३५ अर्धशतके देखील झळकवले आहेत.
आता त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. कोहलीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ९१ सामन्यात ५२.३७च्या सरासरीने ७४९० धावा आहेत. आता टेलर त्याच्या पुढे गेला आहे. याचवेळी टेलरने वेस्ट इंडिजचे माजी सलामीवीर डेसमंड हेन्स यांनाही मागे टाकले. त्यांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ११६ सामन्यात ४२.२९च्या सरासरीने ७४८७ धावा आहेत.
भारतीय संघासाठी धोक्याची घंटा
दरम्यान, रॉस टेलर फॉर्ममध्ये परत आल्याने भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. ज्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. त्यापूर्वी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा पुरेपूर फायदा उठवत टेलरने आपला फॉर्म परत मिळवला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडच्या या अनुभवी फलंदाजापासून सावध राहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? या व्हिडिओतून मिळाले संकेत
मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय
कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान






