…म्हणून राष्ट्रगीतावेळी न्यूझीलंड संघासह उपस्थित होती रॉस टेलरची मुलं

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरसाठी खास ठरला आहे. कारण हा त्याचा 100 वा कसोटी सामना आहे.

त्यामुळे आज या दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी सामन्यापूर्वी होणाऱ्या राष्ट्रगीतावेळी टेलरची 8 वर्षांची मुलगी मॅकेन्झी आणि 6 वर्षांचा मुलगा जॉन्टी न्यूझीलंड संघासह मैदानात उपस्थित होते. यावेळीचा व्हिडिओ स्काय स्पोर्ट्स न्यूझीलंडच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच न्यूझीलंड संघाच्या ट्विटर हँडेलवरही या क्षणांचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसते की मॅकेन्झी आणि जॉन्टीने न्यूझीलंडची काळी जर्सी घातली असून त्यावर टेलरचे नाव आणि त्याचा 3 हा जर्सी क्रमांक लिहीलेला आहे. तसेच राष्ट्रगीत संपल्यानंतर मॅकेन्झी आणि जॉन्टी हे दोघेही पुन्हा मैदानाबाहेर गेले. त्याचबरोबर या सामन्यासाठी आज स्टेडियममध्ये टेलरचे कुटुंबिय आणि त्याचे जवळचे सहकारी उपस्थित आहेत.

तसेच या सामन्याच्या पूर्वसंध्येला(20 फेब्रुवारी) न्यूझीलंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान स्मिथ यांनी टेलरला एका छोट्या कार्यक्रमात 100 व्या कसोटी सामन्याची कॅप प्रदान केली. यावेळी न्यूझीलंड संघातील खेळाडू आणि टेलरचा मुलगा जॉन्टी हा देखील उपस्थित होता.

2006ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने आज 100 कसोटी सामने खेळण्याबरोबरच एक मोठा इतिहास क्रिकेटमध्ये रचला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

टेलरने आत्तापर्यंत वनडेचे 231 सामने आणि टी20चे 100 सामने खेळले आहेत. त्याने काहीदिवसांपूर्वीच भारताविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 100 टी20 सामने खेळण्याचा टप्पा पार केला होता आणि आता तो 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

त्याचबरोबर टेलर 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी(112), स्टिफन फ्लेमिंग(111) आणि ब्रेंडन मॅक्यूलम(101) यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

You might also like