चेन्नईच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या आजच्या आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरने यंदाच्या हंगामात पहिले दोन सामने जिंकून झोकात सुरुवात केली होती. तीच लय कायम ठेवत त्यांनी कोलकाताला हरवून विजयाची हॅटट्रिक केली.
या सामन्यात बंगलोरने प्रथम फलंदाजी करतांना २०४ धावांचा डोंगर उभारला. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सने या डावात स्फोटक फलंदाजी केली. त्यामुळेच बंगलोरने २०० धावांचा टप्पा गाठला. यासह एक अभिमानास्पद रेकॉर्ड देखील बंगलोरने आपल्या नावे केला.
बंगलोरची दमदार फलंदाजी
कोलकाता विरूद्ध बंगलोरची सुरुवात खराब झाली होती. त्यांच्या ९ धावांवरच दोन विकेट्स पडल्या होत्या. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने सलामीवीर देवदत्त पड्डीकलसह डाव सांभाळला. तसेच शेवटी एबी डिव्हिलियर्सने चौफेर फटकेबाजी करत बंगलोरची धावसंख्या २०४ पर्यंत पोहोचवली.
यासह बंगलोरचा संघ आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा २००हून अधिक धावा करणारा संघ ठरला. बंगलोरने आयपीएल मध्ये तब्बल २० वेळा २००हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांच्या नंतर चेन्नईचा संघ असून त्यांनी १७ वेळा हा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २००हून अधिक धावा करणारे संघ –
१) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – २०*
२) चेन्नई सुपर किंग्ज – १७
३) पंजाब किंग्ज – १५
४) मुंबई इंडियन्स – १४
५) कोलकाता नाईट रायडर्स – १२
दरम्यान, या विक्रमासह विजय देखील मिळवल्याने बंगलोरचा आनंद द्विगुणित झाला आहे. बंगलोरने दिलेल्या २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना कोलकाताचा संघ २० षटकांत ८ बाद १६६ धावाच करू शकला. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३८ धावांनी विजय मिळवला आणि पॉईंट्स टेबल मध्ये देखील अव्वल स्थान गाठले.
महत्वाच्या बातम्या:
पाहता पाहता आयपीएल सुरु होऊन १३ वर्ष झाली! पाहा या १३ वर्षातील खास आकडेवारी
RCBvsKKR Live: फलंदाजांनी ठोकले, गोलंदाजांनी रोखले; बेंगलोरचा कोलकातावर ३८ धावांनी मोठा विजय
व्हिडिओ : मॅक्सवेलचे अर्धशतक होताच कोहली झाला भलताच खुश, उत्साहात केले अभिनंदन