दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने ३ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी बेंगलोरच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या अपयशानंतर चांगले पुनरागमन करत राजस्थानला २० षटकात ९ बाद १४९ धावांवर रोखले. यावेळी अखेरच्या षटकात हर्षल पटेलने ३ विकेट्स घेतल्या.
त्याने २० व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रियान परागला ९ धावांवर, तिसऱ्या चेंडूवर ख्रिस मॉरिसला १४ धावांवर आणि अखेरच्या चेंडूवर चेतन साकारियाला २ धावांवर बाद केले. त्यामुळे हर्षलच्या या आयपीएल हंगामात ४३ सामन्यांनंतर २६ विकेट्स झाल्या असून तो सध्यातरी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
त्यामुळे हर्षल पटेलने एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अनकॅप खेळाडूंमध्ये (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले खेळाडू) अव्वल क्रमांक मिळवला आहे. या यादीत त्याने युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे. चहलने २०१५ साली बेंगलोरसाठी २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी चहलचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही झाले नव्हते. त्याचप्रमाणे हर्षलने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. त्यामुळे आता त्याने या यादीत चहलला मागे टाकले आहे.
इतकेच नाही तर, हर्षल पटेलने एका आयपीएल हंगामात बेंगलोरसाठी देखील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. याबाबतीतही त्याने चहलला आणि विनय कुमारला मागे टाकले आहे. विनयने २०१३ साली बेंगलोरकडून २३ विकेट्स घेतल्या होत्या.
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे अनकॅप खेळाडू
२६ – हर्षल पटेल (आरसीबी, २०२१*)
२३ – युजवेंद्र चहल (आरसीबी, २०१५)
२१ – श्रीसंत अरविंद (आरसीबी, २०११)
२१ – सिद्धार्थ कौल (एसआरएच, २०१८)
एका आयपीएल हंगामात आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
२६ – हर्षल पटेल, २०२१*
२३ – युजवेंद्र चहल, २०१५
२३ – विनय कुमार, २०१३
२१ – अनिल कुंबळे, २००९
२१ – श्रीसंत अरविंद, २०११
२१ – युजवेंद्र चहल, २०१६
२१ – युजवेंद्र चहल, २०२०
ब्रावोचा विक्रम मोडण्याची संधी
आयपीएल २०२१ हंगाम सध्या सुरु असून साखळी फेरीतील बेंगलोरचे आणखी ३ सामने बाकी असल्याने आगामी सामन्यात हर्षल एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा ड्वेन ब्रावोचा विक्रम मोडू शकतो. सध्या एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने २०१३ साली ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलला यंदा ब्रावोचा हा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. त्यासाठी त्याला आणखी ७ विकेट्सची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात भारताच्या प्लईंग इलेव्हनमध्ये सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा व्हावा समावेश, नेहराचे भाष्य
कुलदीप यादववर झाली मोठी शस्त्रक्रिया; भावनिक पोस्ट करत म्हणाला, ‘आता मी लवकर…’
एकही सामना न खेळता ‘ज्युनिअर तेंडुलकर’ आयपीएलमधून आऊट; या गोलंदाजाला मिळाली जागा