दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ वा सामना बुधवारी (२९ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरचा हा ११ सामन्यांमधील ७ वा विजय ठरला आहे.
या सामन्यात राजस्थानने २० षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या होत्या. तसेच बेंगलोरसमोर विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बेंगलोरने १७.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केला.
बेंगलोरकडून १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कलने चांगली सुरुवात केली होती. पण पडीक्कलला २२ धावांवर ६ व्या षटकात मुस्तफिजूरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याची आणि विराटची ४८ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर विराटला ७ व्या षटकात रियान परागने थेट स्टंपवर चेंडू फेकत अप्रतिमरित्या धावबाद केले. विराटने २५ धावा केल्या.
पण यानंतर यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भारत आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागादारी करत बेंगलोरला विजयाच्या जवळ नेले. पण, १६ व्या षटकात श्रीकर भारतला मुस्तफिजूरने बाद करत त्यांची ६९ धावांची भागीदारी तोडली. श्रीकर भारतने ३५ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. त्यानंतर मॅक्सवेलने एबी डिव्हिलियर्ससह बेंगलोरला विजयाच्या पार नेले. मॅक्सवेलने नाबाद अर्धशतक करताना ३० चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५० धावांची खेळी केली. तर डिव्हिलियर्स ४ धावांवर नाबाद राहिला.
चांगल्या सुरुवातीनंतर राजस्थानची फलंदाजी कोलमडली
या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईसने सलामीला फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्विकारला. लुईसने पदार्पणवीर जॉर्ज गार्टनने गोलंदाजी केलेल्या चौथ्या षटकात १८ धावा काढल्या. या दोघांनी ७७ धावांची सलामी दिली. पण अखेर जयस्वालला ९ व्या षटकात डॅनिएल क्रिश्चियनने बाद करत ही जोडी तोडली. जयस्वाल २२ चेंडूत ३१ धावा करुन बाद झाला.
यानंतर लुईसने कर्णधार संजू सॅमसनला साथीला घेत डाव पुढे नेला. दरम्यान, १० व्या षटकात ३१ चेंडूत लुईसने अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर तो १२ व्या षटकात जॉर्ज गार्टनच्या चेंडूवर चूकीचा फटका मारत यष्टीरक्षक श्रीकर भारतकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.
यानंतर मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. १३ व्या षटकात महिपाल लोमरोरला युजवेंद्र चहलने ३ धावांवर बाद केले. तर १४ व्या षटकात संजू सॅमसन १९ धावांवर आणि राहुल तेवातिया २ धावांवर शाहबाज अहमदच्या गोलंदाजीविरुद्ध बाद झाले. त्यामुळे राजस्थानला दुहेरी धक्के बसले.
पुढे, १७ व्या षटकात लियाम लिव्हिंगटनला युजवेंद्र चहलने ६ धावांवर बाद केले. तर अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रियान परागला ९ धावांवर, तिसऱ्या चेंडूवर ख्रिस मॉरिसला १४ धावांवर आणि अखेरच्या चेंडूवर चेतन साकारियाला २ धावांवर हर्षल पटेलने बाद करत राजस्थानचा डाव २० षटकांत ९ बाद १४९ धावांवर संपवला.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी बेंगलोरने अंतिम ११ जणांच्या संघात एक बदल केला. त्यांनी काईल जेमिसनच्या ऐवजी जॉर्ज गार्टनला संधी दिली आहे. त्यामुळे या सामन्यातून गार्टनने आयपीएल पदार्पण केले.
तसेच राजस्थानने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात कार्तिक त्यागीला स्थान दिले. त्याला जयदेव उनाडकट ऐवजी संघात संधी दिली.
Drop a ❤️ for George Garton, who makes his debut in the Red and Gold! 🤩
Go well mate! 🙌🏻#PlayBold #WeAreChallengers #ನಮ್ಮRCB #IPL2021 #RRvRCB pic.twitter.com/gjVztPE5sq
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 29, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन साकरिया, मुस्तफिजूर रहमान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.