कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी (१५ एप्रिल) झालेला आयपीएल २०२२मधील २५ वा सामना सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट्स राखून जिंकला. या सामना विजयाचा शिल्पकार ठरला राहुल त्रिपाठी. त्रिपाठीव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज टी नटराजन याचाही या सामना विजयात मोलाचा वाटा राहिला. त्याने या सामन्यादरम्यान ३ विकेट्स घेतल्या. यासह त्याने चालू हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत युझवेंद्र चहल याची बरोबरी केली आहे. तरीही पर्पल कॅपचा मानकरी मात्र अजूनही चहलच आहे. ते कसे? जाणून घेऊया…
नटराजनची कोलकात्याविरुद्ध भेदक गोलंदाजी
कोलकाताने हैदराबादविरुद्ध (KKR vs SRH) प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १७५ धावा केल्या होत्या. यादरम्यान ३१ वर्षीय नटराजनने (T Natarajan) ४ षटके गोलंदाजी करताना ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये कोलकाताच सलामीवीर वेंकटेश अय्यर, सुनिल नारायण आणि नितिश राणा यांचा समावेश होता. त्याने वेंकटेशला ६ धावा आणि नारायणला ६ धावांवर बाद केले होते. तसेच त्याने कोलकाताचा अर्धशतकवीर राणाला ५४ धावांवर आपला शिकार बनवले होते.
या ३ विकेट्ससह त्याने या हंगामातील १२ विकेट्सचा आकडा गाठला आहे. यासह त्याने चालू हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू चहलची बरोबरी केली आहे. चहलनेही आतापर्यंत १२ विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे चहल आणि नटराजनच्या विकेट्स सारख्या असूनही पर्पल कॅप (Purple Cap) मात्र चहलकडेच आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा नियम तरी (Purple Cap Rule) काय आहे?
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप मिळते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण दोन गोलंदाजांच्या समान विकेट्स असतील, तर ज्याने कमीत कमी चेंडूत जास्त विकेट्स घेतल्या आहेत त्याच्याकडे ही पर्पल कॅप जाते. कारण आयपीएल हा फार जलद खेळ आहे, त्यामुळे कमी चेंडूत कोणी जास्त विकेट्स घेतल्या? या गोष्टीला महत्व दिले जाते.
चहलने ५ सामन्यांमध्ये २० षटके टाकताना १२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच यादरम्यान त्याने केवळ १३६ धावा दिल्या आहेत. तर नटराजनने ६ सामन्यांमध्ये २४ षटके गोलंदाजी करताना २०८ धावा देत १२ विकेट्स घेतल्या आहेत. थोडक्यात चहलने कमी चेंडूंमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे पर्पल कॅप त्याच्या डोक्यावर सजलेली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: उमरानच्या चेंडूवर झाला ड्रामा; लिव्हिंगस्टोन भिडला पंचांशी
दिल्ली संघात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड होतंय Cancel IPL, मीम्सला आलेय उधाण