भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला मुकाबला नागपूरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जोरदार कामगिरी करू इच्छितो. फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्याकडून संघाला धडाकेबाज कामगिरीची आशा असेल.
तसेच, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे बॅट आणि बॉल या दोन्ही माध्यमांतून आपली छाप पाडताना दिसतील. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग किवी फलंदाजांची परीक्षा घेताना दिसतील. दुसरीकडे, एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ टी20 मालिकेतही शानदार कामगिरी करण्याच्या इराद्याने उतरेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. नागपूरच्या या मैदानाला फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स पाहायला मिळतो, ज्यामुळे या ग्राऊंडवर चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पडतो. गोलंदाजांसाठी येथे धावांवर लगाम लावणे अत्यंत कठीण काम असते. म्हणजेच मालिकेच्या सलामीच्या सामन्यातच तुम्हाला भरपूर चौकार आणि षटकार लागताना दिसतील.
नागपूरच्या या मैदानावर आतापर्यंत एकूण 12 टी20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यापैकी 8 सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने मैदान मारले आहे. तर केवळ 4 सामन्यांमध्येच धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 146 आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 125 आहे. या ग्राऊंडवर श्रीलंकेने भारताविरुद्ध खेळताना 20 षटकांत 5 गडी गमावून 215 धावा केल्या होत्या, जी या ग्राऊंडची सर्वोच्च धावसंख्या देखील आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इशान किशन आणि रिंकू सिंग यांना प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागू शकते. नागपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसतील. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा कर्णधार सूर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतात.
तसेच, हार्दिक पांड्यावर मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी असेल, तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका बजावताना दिसतील. घरगुती क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करूनही, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये इशान किशनऐवजी संजू सॅमसनला पसंती मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच शिवम दुबेचा सध्याचा फॉर्म पाहता रिंकूला संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.





