फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये येतो, तेव्हा काय होते, याचा प्रत्यय भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात आला. भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने पुन्हा जुनी लय मिळवली. त्याने श्रीलंकेविरुद्ध रविवारी (दि. 15 जानेवारी) वादळी शतक झळकावले. यासोबतच सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विराटने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2 शतके झळकावली. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तसेच, भारताने श्रीलंकेला मालिकेत 3-0ने क्लीन स्वीप केले. असे असले, तरीही विराटने तिसऱ्या वनडेत मारलेल्या एका शॉटची चर्चा रंगली आहे.
भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करताना श्रीलंका संघ 73 धावांवरच गारद झाला. त्यामुळे भारताने हा सामना तब्बल 317 धावांनी नावावर केला. भारताच्या डावात फलंदाजी करताना विराटने वनडे कारकीर्दीतील 46वे शतक झळकावले. शतक झळकावताना विराटने हेलिकॉप्टर शॉट (Helicopter Shot) खेळला, ज्यामुळे त्यालाही एमएस धोनी (MS Dhoni) याची आठवण आली.
हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ व्हायरल
विराटने या सामन्यात 110 चेंडूंचा सामना करताना नाबाद 166 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 13 चौकार आणि 8 षटकार खेचले. याच 8 षटकारांमधील एक षटकार त्याने माजी कर्णधार एमएस धोनीच्या स्टाईलमध्ये त्याचा हेलिकॉप्टर शॉटही मारला. हा शॉट इतका ताकदीचा होता की, चेंडू थेट 97 मीटर दूर जाऊन पडला.
आता विराट कोहलीचा हेलिकॉप्टर शॉट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विराटने हा शॉट त्याच्या डावाच्या 44व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारला होता. हे षटक श्रीलंकेचा गोलंदाज कुसन रजिथा टाकत होता. या व्हिडिओत ऐकू येते की, समालोचक म्हणत आहेत की, “विराटने माही शॉट खेळला आहे.”
https://twitter.com/its_manu01/status/1614610878539911179?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1614610878539911179%7Ctwgr%5E36ad15ec6aa58553cc1868045cda0d186ef989d6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Fvirat-kohli-hitting-ms-dhoni-like-helicopter-shot-in-india-vs-sri-lanka-3rd-odi-kohli-mahi-shot-tspo-1616554-2023-01-16
शतकानंतर आणखी आक्रमक झाला विराट
खरं तर, ज्यावेळी विराटने हेलिकॉप्टर शॉट मारला, तेव्हा त्याने त्याचे शतक पूर्ण केले होते. विराट जेव्हा 101 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट आले होते. शतकानंतर विराट आणखी आक्रमक झाला. विराटने पुढच्याच म्हणजे 45व्या षटकात चमिका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार खेचले होते.
विराटने या मालिकेतील 3 वनडे सामन्यात सर्वाधिक 283 धावा चोपल्या. यामध्ये 2 शतकांचा समावेश होता. विराटची यादरम्यान नाबाद 166 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली. यामुळेच त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (run machine virat kohli hitting ms dhoni like helicopter shot in india vs sri lanka 3rd odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेंच्युरीनंतर विराटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पण अनुष्काच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…
विराटला यशस्वी बनवण्यात ‘या’ तिघांचा मोलाचा वाटा; कोहलीही म्हणाला, ‘त्यांच्यामुळेच मी आज इथे…’