इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना दसऱ्याच्या मूहुर्तावर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १९२ धावा धावफलकावर लावल्या. यादरम्यान चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ३२ धावांची खेळी करत या हंगामातील ऑरेंज कॅप पटकावली.
ऋतुराजच्या नावे ऑरेंज कॅप
संपूर्ण आयपीएल हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत ऋतुराज गायकवाडने धावांचा अक्षरशः रतीब घातला होता. अंतिम सामन्यापूर्वी त्याला सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज म्हणून ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी २४ धावांची आवश्यकता होती. त्याने या डावात ३२ धावा काढत केएल राहुलला मागे सोडले. यासह ऑरेंज कॅप पटकावणारा तो केवळ पाचवा भारतीय बनला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा, विराट कोहली व केएल राहुल यांनी ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होते.
ऑरेंज कॅप पटकावतात केला विक्रम आपल्या नावे
ऋतुराजने ही ऑरेंज कॅप पटकावताच सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप मिळवणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. ऋतुराजने २४ वर्ष आणि २२७ दिवस वय असताना ही कामगिरी केली. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आहे. त्याने २४ वर्ष आणि ३२८ दिवस इतके वय असताना आयपीएलच्या पहिल्या हंगामात पंजाबसाठी खेळताना ऑरेंज कॅप जिंकली होती. या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली व सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन हे आहेत. त्यांनी अनुक्रमे २७ वर्ष २०६ दिवस आणि २७ वर्ष २९२ दिवस या वयात ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लय भारी! यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांचाच बोलबाला; केल्यात सर्वाधिक धावा
राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा