बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुढील महिन्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी बॉर्डर-गावसकर ट्राॅफी मध्ये दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार असून त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय संघात दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि आंध्रचा अष्टपैलू नितीश रेड्डी यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. मोहम्मद शमी दुखापतीमुळे जवळपास वर्षभररपासून संघाबाहेर आहे. त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली. ज्यामुळे त्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागत आहे. काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावस्कर स्पर्धेपर्यंत शमी तंदुरुस्त होईल. असे वाटत असले तरी आता या वेगवान गोलंदाजाला मैदानात परतण्यास वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शमीशिवाय कुलदीप यादवलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे.
वास्तविक, कुलदीप यादवला पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकालीन पुनर्वसनाचा सल्ला देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडलेल्या संघातून अक्षर पटेलला वगळण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या कसोटीत 11 बळी घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाडच्या नावाचीही चर्चा होत होती. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघाच्या कर्णधारपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यालाही संधी देण्यात आलेली नाही. बराच वेळ बाहेर असलेला चेतेश्वर पुजाराही संघात परतला नाही. मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये पुजाराने फलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋतुराज गायकवाड पुन्हा दुर्लक्षीत
BGT 2024-25; बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूला संधी
सेहवागने राजकारण करुन मला फसवलं! पंजाब किंग्जच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप