रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं 40 चेंडूत 69 धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्यानं एक इतिहास रचला आहे.
ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्यानं लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा विक्रम मोडला. 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा ऋतुराज गायकवाड गेली चार वर्षे सलामीवीर म्हणून खेळतोय. या हंगामात त्याला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आलं.
ऋतुराजनं आयपीएलमध्ये 58 सामन्यांच्या 57 डावांमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठला. तर केएल राहुलला आयपीएलमध्ये 2000 धावा करण्यासाठी 60 डाव लागले. या लिस्टमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिननं 63 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा करण्याच्या बाबतीत ख्रिस गेल आणि शॉन मार्श ऋतुराजच्या पुढे आहेत. गेलनं 48 तर मार्शनं 52 डावात 2000 धावा केल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जसाठी 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड हा सहावा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी, फाफ डू प्लेसिस, मायकेल हसी आणि मुरली विजय यांनी ही कामगिरी केली आहे. ऋतुराजनं या दरम्यान 1 शतक आणि 15 अर्धशतकं लगावली आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या इनिंगबद्दल बोलायचं झालं तर, ऋतुराजनं अवघ्या 40 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 69 धावांची शानदार खेळी केली. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट 172.50 इतका राहिला. ऋतुराज चेन्नईसाठी नेहमी सलामीला येतो. मात्र या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ऋतुराजच्या ऐवजी मुंबईविरुद्ध अजिंक्य रहाणे सलामीला आला होता. मात्र चेन्नईचा हा प्रयोग कामी आला नाही. रहाणे 8 चेंडूत 5 धावा करून तंबूत परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न
टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय! ‘हिटमॅन’ सारखा दुसरा कोणीच नाही!
‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!