दुलीप ट्रॉफी 2024 मधील दुसऱ्या फेरीसाठीचे सामने संपले आहेत. अनंतपूरमधील भारत क आणि भारत ब यांच्यातील सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र भारत क संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाडने या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली असून सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली आहेत. असे असले तरीही, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रुतुराजची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चाहते बीसीसीआयच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.
भारत क ने पहिल्या डावात 525 धावा केल्या
भारत क च्या फलंदाजांनी पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत 525 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. या डावात रुतुराज गायकवाडने 58 धावांनी शानदार खेळी खेळली होती. तसेच इशान किशनने 111 धावा करून संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला होता. याशिवाय बाबा इंद्रजीतने 78 आणि मानव सुतारने 82 धावा केल्या होत्या. या खेळाडूंमुळेच भारत क संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या करू शकला. यानंतर भारत क संघाने दुसऱ्या डावात 128 धावा करून डाव घोषित केला होता. या डावातही रुतुराजने 62 धावा केल्या होत्या.
रुतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) खेळतो आणि त्याने अनेक सामन्यांमध्ये सीएसकेला विजय मिळवून दिला आहे. भारत ब संघाला पहिल्या डावात 332 धावा करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे भारत क संघाला 193 धावांची आघाडी मिळाली होती. भारत ब साठी कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने 157 धावा केल्या आणि नारायण जगदीसनने 70 धावांचे योगदान दिले होते. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त इतर फलंदाज संघासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान देण्यात अपयशी ठरले आहेत.
भारत क संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 च्या गुणतालिकेत भारत क संघ अव्वल स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले असून त्यापैकी एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यांच्या खात्यात 9 गुण आहेत. भारत ब संघ दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे 7 गुण आहेत. भारत अ ने आतापर्यंत एक सामना जिंकला आहे तर एक गमावला आहे. ते 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारत ड ने एकही सामना जिंकलेला नाही. या कारणास्तव ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी बांगलादेश वापरणार ‘हा’ फॉर्म्युला, कर्णधाराचा खुलासा
समालोचकाला दिवसाला मिळतो चक्क इतका पगार? आकाश चोप्राचा मोठा खुलासा
“धोनी नॉनव्हेज खायचा, पण माझ्यासाठी त्याने महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ले”, जुन्या रूममेटचा खुलासा