आयपीएल २०२० चा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी जरी निराशाजनक ठरला असला तरी त्यांच्याकडून खेळलेल्या काही युवा खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले आहेत. या युवा खेळाडूंमधील एक नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड. त्याने यंदाच्या हंगामात शानदार फलंदाजी करताना चेन्नईच्या शेवटच्या तीन विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे तो आता प्रकाशझोतात आला असून त्याच्याशी एका कंपनीने करार देखील केला आहे.
ऋतुराजबरोबर स्पोर्ट्स मार्केटींग फर्म असलेल्या बेसलाइन वेंचर्सने बहु-वर्ष करार केला आहे. बेसलाइन वेंचर्स आता गायकवाडचे सर्व व्यावसायिक हितसंबंध सांभाळणार आहे.
याबद्दल ऋतुराज म्हणाला, ‘बेसलाईनचा देशातील काही मोठ्या खेळाडूंबरोबर करार आहे आणि त्यामुळे मी देखील त्यांच्याशी करार करण्यास उत्सुक आहे. ते भारतातील सर्वोत्तम स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनींपैकी एक आहेत. तसेच त्यांनी अनेक युवा खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आणि त्यांची कारकिर्द घडवण्यासाठी मदत केली आहे. मला त्यांच्याबरोबर चांगल्या भागीदारीची अपेक्षा आहे.’
ऋतुराजची आयपीएलमध्ये शानदार कामगिरी –
आयपीएल २०२० मध्ये सुरुवातीला अडखळलेला ऋतुराज गायकवाड नंतर चांगल्या फॉर्ममध्ये परतला. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने आयपीेलमध्ये ६ सामन्यात ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या. त्याचे या आयपीएल दरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनेही कौतुक केले आहे.
महाराष्ट्राकडूनही शानदार कामगिरी –
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगावचा रहिवासी असलेला २३ वर्षीय ऋतुराज २०१६ पासून महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने २०१६ ला वयाच्या १९ व्या वर्षी महाराष्ट्राकडून झारखंडविरुद्ध रणजीमध्ये पदार्पण केले होते. सलामीवीर म्हणून उत्तमोत्तम कामगिरी करत ऋतुराजने भारतीय अ संघात देखील जागा मिळवली आहे.
त्याने आत्तापर्यंत २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात ३८.५४ च्या सरासरीने ४ शतके आणि ६ अर्धशतकांसह १३४९ धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ४९च्या सरासरीने ५४ सामन्यात २४९९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ३४ टी२० सामन्यात १०४७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विन खऱ्या अर्थाने बादफेरीचा प्लेअर, आम्ही नाही आकडेच सांगतायत हे
खोटा दहशतवादी कट रचल्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या भावाला अटक
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित ‘गोल्डन डक’; केली नकोश्या विक्रमाची नोंद