आयपीएल २०२१ स्पर्धेत रविवारी (१० ऑक्टोबर) रोमांचक सामना पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ७० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडच्या नावे आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले आहे. क्वालिफायरच्या सामन्यात देखील संघाला गरज असताना, ऋतुराज गायकवाडने तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. त्याने सलामीला फलंदाजीला येत ५० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्या.
या डावात ७० धावांची खेळी करणारा ऋतुराज गायकवाड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यासह त्याच्या नावे आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऋतुराज गायकवाड हा असा खेळाडू बनला आहे, ज्याने आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघाविरुद्ध खेळताना सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाग, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएलमधील सर्व सहभागी संघाविरुद्ध खेळताना सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
याखेरीज ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक वेळेस सामनावीर पुरस्कार पटकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात ४ वेळेस सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. त्याच्यापूर्वी मायकल हसीने हा कारनामा ५ वेळेस केला आहे. त्यावेळी मायकल हसीने देखील चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना असा कारनामा केला होता.
आयपीएल स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने पटकावलेले सामनावीर पुरस्कार
६५ धावा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
७२ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
६२ धावा विरुद्ध पंजाब किंग्स
७५ धावा विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
८८ धावा विरुद्ध मुंबई इंडियन्स
१०१ धावा विरुद्ध राजस्थान रॉयल्स
७० धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा विजयी चौकार आणि अश्रूंचा फुटला बांध, साक्षीही झाली भावुक; झिवाला घेतले कवेत





