वॉर्सेस्टरशायरचा कर्णधार जेक लिबी याने ‘लिस्ट-ए’ (List-A) क्रिकेटमधील सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा भारताच्या ऋतुराज गायकवाडचा जागतिक विक्रम मोडला आहे. या यादीत आता गायकवाड दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ससेक्सविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी करत लिबीने अव्वल स्थान पटकावले. या फॉर्मेटमधील त्याचे हे सलग तिसरे शतक ठरले.
या शतकानंतर लिबीची फलंदाजी सरासरी 61.40 झाली आहे, तर ऋतुराज गायकवाडची सरासरी 58.61 इतकी आहे. विशेष म्हणजे, या अव्वल पाच फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचाही समावेश आहे.
लिबीने आतापर्यंत 56 ‘लिस्ट-ए’ सामने खेळले असून, त्यात 61.40 च्या सरासरीने 2456 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आणि 18 अर्धशतके आहेत.
सध्या सुरू असलेल्या ‘वन-डे कप’मध्ये सलग तिसरे शतक झळकावून लिबीने ऋतुराज गायकवाडला मागे टाकले आणि ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा विक्रम आपल्या नावे केला.
लिबीने ससेक्सविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याने 96 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या, ज्यामुळे वॉर्सेस्टरशायरला 334 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य यशस्वीपणे गाठता आले.
लिबीच्या सध्याच्या फॉर्मची एक उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेत त्याने सलग तीन डावांमध्ये प्रत्येकी नेमक्या 109 धावा केल्या आहेत.
त्याच्या या शानदार कामगिरीची सुरुवात मिडलसेक्सविरुद्धच्या नाबाद 109 धावांच्या खेळीने झाली. या खेळीमुळे वॉर्सेस्टरशायरला 294 धावांचे लक्ष्य गाठता आले होते. त्यानंतर त्याने एसेक्सविरुद्ध पुन्हा एकदा 109 धावांची खेळी केली, मात्र त्या सामन्यात त्याच्या संघाला 377 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. तरीही, ससेक्सविरुद्धच्या सामन्यात लिबीने पुन्हा एकदा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ॉ
‘लिस्ट-ए’ क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या अव्वल पाच फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. त्याने 350 सामन्यांत 57.80 च्या सरासरीने 16591 धावा केल्या आहेत. या प्रकारात आतापर्यंत सर्वाधिक शतके (59) झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वाधिक फलंदाजी सरासरी:
जेक लिब्बी – 61.40
ऋतुराज गायकवाड – 59.61
सॅम हेन – 58.18
मायकेल बेवन – 57.86
विराट कोहली – 57.80






