अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात शनिवारी (२ ऑक्टोबर) डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबीच्या शेख झायद स्टेडियमवर झाला. या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. पण असे असले तरी या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी करत सर्वांना प्रभावित केले.
षटकार मारत शतक
ऋतुराज या सामन्यात ६० चेंडूत १०१ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याने त्याचे शतक डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारत पूर्ण केले. झाले असे की डावाच्या अखेरच्या षटकात पहिले ४ चेंडू जडेजाने खेळले. त्याने या ४ चेंडूत १५ धावा काढल्या. त्यानंतर अखेरचे दोन चेंडू ऋतुराजला खेळायला मिळाले. यावेळी ऋतुराज ९५ धावांवर होता.
त्याने २० व्या षटकातील ५ वा चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर शतक करण्यासाठी ऋतुराजला ५ धावांची गरज होती. यावेळी त्याने मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर डीप मिड विकेटच्या वरुन षटकार ठोकला आणि शतक पूर्ण केले. त्याने हा १०८ मीटरचा षटकार मारला. हा आयपीएल २०२१ हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर होता. पालोर्डने १०५ मीटरचा षटकार मारला होता.
https://twitter.com/_buddhu/status/1444332476604637184
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
चेन्नईचा पराभव
या सामन्यात ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ४ बाद १८९ धावा केल्या आणि राजस्थानला १९० धावांचे आव्हान दिले. चेन्नईकडून ऋतुराज व्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने २५ धावांची खेळी केली. तर मोईन अलीने २१ धावा केल्या. तसेच अखेरच्या काही षटकात रविंद्र जडेजाने आक्रमक खेळी केली. त्याने १५ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर चेतन साकारियाने १ विकेट घेतली.
त्यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी तुफानी फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. त्यांना एविन लुईस (२७), संजू सॅमसन (२८) आणि ग्लेन फिलिप्सने (१४*) चांगली साथ दिली. जयस्वालने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. तर, दुबे ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.
त्यामुळे १७.३ षटकात राजस्थानने धावांचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर केएल असिफने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
शतक एक विक्रम अनेक! ऋतुराजने शतकी खेळी करत ४ मोठ्या विक्रमांना घातली गवसणी
ऋतुराजचा नाद खुळा, आयपीएलमध्ये अशा पद्धतीने शतक पूर्ण करणारा ठरला एकमेव खेळाडू
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या आणले नाकी नऊ, उभारली आपली सर्वोच्च धावसंख्या