भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील (india tour of south africa) पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने या सामन्यात चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. बुमराहने या सामन्याच्या दुसऱ्या डावातील ४१ व्या षटकात एका खास विक्रमाची नोंद केली.
बुमराहाने दुसऱ्या डावात टाकलेल्या ४१ व्या षटकात दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज ८ धावांवर त्रिफळाचीत झाला होता. या विकेटसह बुमराहाने विदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यांतील त्याच्या १०० विकेट्स पूर्ण केल्या. सोबतच सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये विदेशात १०० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज देखील ठरला आहे.
जसप्रीत बुमराहाने तोडला भागवत चंद्रशेखरचा विक्रम
भारतासाठी विदेशातील सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने कसोटी कारकिर्दीतील विदेशात खेळलेल्या २३ व्या कसोटी सामन्यात ही किमया साधली आहे. यापूर्वी या यादीत भागवत चंद्रशेखर पहिल्या क्रमांकावर होते, ज्यांनी २५ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. परंतु आता बुमराहने त्यांना मागे टाकले आहे. चंद्रशेखर सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आहे. अश्विनने त्याच्या विदेशातील १०० कसोटी विकेट्स २६ सामन्यांमध्ये घेतल्या आहेत.
विदेशात सर्वात कमी सामन्यांमध्ये १०० कसोटी विकेट्स पूर्ण करणारे भारतीय गोलंदाज –
२३ कसोटी सामने – जसप्रीत बुमराह
२५ कसोटी सामने – भागवत चंद्रशेखर
२६ कसोटी सामने – आर अश्विन
२८ कसोटी सामने – मो. शमी
२८ कसोटी सामने – बिशन सिंह बेदी
२८ कसोटी सामने – जवागल श्रीनाथ
हेही वाचा- “यॉर्कर किंग!” जसप्रीत बुमराहने टाकलेल्या ‘त्या’ चेंडूची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या विजयाचा विचार केला, तर भारताने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने १९७ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ देखील अवघ्या १७४ धावांवर सर्वबाद झाला, पण तरीही दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या डावात ३०५ धावांची आवश्यकता होती. दक्षिण अफ्रिकेला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि त्यांचा संघ १९१ धावा करून पुन्हा स्वस्तात गुंडाळला गेला.
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या हरनुरला मिळालाय क्रिकेटचा वारसा; अजोबा, वडील, काका देखील क्रिकेटर
द. आफ्रिकेवर मोठा विजय मिळवूनही WTC गुणतालिकेत भारताची अशी आहे स्थिती, पाकिस्तान अजूनही पुढेच
व्हिडिओ पाहा –