आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये बुधवारी (४ मार्च) पहिला उपांत्य सामना खेळला गेला. यामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर समोरा-समोर आले. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन याने केवळ ३३ चेंडूत शतकी खेळी करत अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावे केली आणि संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळवून दिले. त्याने यावेळी सर्वात जलद शतकी केली, मात्र विराट कोहलीचा एक विक्रम तोडण्यासाठी त्याला केवळ एक चेंडू कमी पडला.
टी२० विश्वचषकाचा हा दहावा हंगाम शेवटाला आला असताना चाहत्यांना धक्कादायक खेळी पाहायला मिळाली आहे. ते पाहून गोलंदाजही हैरान झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. सध्या टी२०मध्ये हे माफक लक्ष्य वाटत असले तरी त्या लक्ष्याचा पाठलाग न्यूझीलंडने ज्याप्रकारे केला त्याची अधिक चर्चा सुरू आहे. त्यांनी १२.५ षटकातच विजय मिळवला.
न्यूझीलंडच्या विजयात सर्वात मोठी कामगिरी ऍलनने बजावली. त्याने ३३ चेंडूत नाबाद १०० धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने शतकी खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ३०३.०३ राहिला. हे टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले आहे. असे असले तरी विराट कोहलीचा एक विक्रम मोडण्यास तो मुकला.
ऍलनने केवळ चौकार आणि षटकार मारूनच लक्ष्याचा पाठलाग केला नाही, त्याने एकेरी आणि दुहेरी धावाही घेतल्या. यामुळे त्याच्या या डावात डॉट बॉलही कमी होते. त्याने ३३ चेंडूमधील केवळ ४ चेंडू डॉट खेळले. हे सर्वात कमी वाटत असले तरी त्याला विराटचा विक्रम मोडता आला नाही. टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्याच्या डावात सर्वात कमी डॉट बॉल खेळण्याच्या विक्रमाच्या यादीत ऍलन दुसऱ्या स्थानावार आला आहे. या यादीत विराटच्या पहिल्या स्थानावर आहे.
विराटने २०१४मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्या डावात त्याने केवळ ३ डॉट बॉल खेळले होते, जो टी२० विश्वचषकातील मोठा विक्रम आहे.
न्यूझीलंडच्या विजयात त्यांचा दुसरा सलामीवीर टीम सेफर्टचेही योगदान राहिले त्याने ३३ चेंडूत ५८ धावा केल्या. हा सामना न्यूझीलंडने ९ विकेट्सने जिंकला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.






