– वरद सहस्रबुद्धे
सचिन रमेश तेंडुलकर… काही लोकांना हे नाव क्रिकेटची व्याप्ती सांगायला पुरेस आहे. टेनिसमध्ये रॉजर फेडरर, बास्केटबॉलमध्येमध्ये मायकल जॉर्डन, फॉर्म्युला वनमध्ये मायकल शुमाकर त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन. खेळाचा प्रकार, गुणवत्ता, कारकीर्द या आघाड्यावर विचार केला तरी ही तुलना करणे चुकीचे असेलही पण वर नमूद केलेले खेळाडू आपल्या खेळात, आपापल्या काळात बेस्टच आहेत. ‘या सम हा’ ही उक्ती या बाप लोकांसाठी तंतोतंत लागू पडते.
सचिन तेंडुलकर सर्वकालीन महान फलंदाज आहे हे मी सांगणं म्हणजे काजव्याने सुर्य दाखवण्या सारखं आहे. रन्स असो किंवा एकूण खेळलेले सामने असो शतकं असो (वनडे शतकाचा रेकॉर्ड थोडा संकटात आहे.) सगळीकडे फक्त सचिन सचिन आणि फक्त सचिनच दिसतो. कूक, लारा, पॉटिंग सगळे रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्न करत होते पण शेवटी सचिनच टॉपवर राहिला.
जितका सचिन तेंडुलकर फलंदाज म्हणून ग्रेट आहे तितकाच तो गोलंदाज म्हणून देखील वाईट नव्हता. खरंतर त्याला वेगवान गोलंदाज बनायचे होते, पण एमआरएफ पेस अकॅडमीच्या डेनिस लिली यांच्या सल्ल्याने त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि Rest is history. भारतीय संघात सचिन कायम पार्ट टाइम बॉलर राहिला तरी त्यात त्याला वरचे स्थान होते. दुखापतीनंतर(टेनिस एल्बो नंतर) त्याने फारशी बॉलिंग केली नसली तरी त्याच्याआधी त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्या काळातील कर्णधार म्हणजे अझर, गांगुलीसाठी तो द मॅन विथ द गोल्डन आर्मच होता. त्याकाळी तो पाचवा गोलंदाजीला पर्याय असल्याने त्याने सुरूवातीला सर्रास गोलंदाजी केली आहे म्हणूनच सर्वात कमी वयाचा चार विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय.
ही तुलना नाही किंवा वॉर्नला कमी लेखणं पण वॉर्नपेक्षा सचिनच्या ‘5 wicket haul’ जास्त आहेत पण हे काही त्याच्या बॉलिंग ग्रेटनेसचं इंडिकेटर ठरणार नाही कारण वासिम अक्रमची कसोटीतली सर्वोच्च धावसंख्या (२५७) ही सचिनच्या सर्वोच्च धावसंख्येपेक्षा(२४८) जास्त आहे. जेव्हा तो फलंदाजीमध्ये चमक दाखवू शकायचा नाही तेव्हा ती कसर तो गोलंदाजीमध्ये भरून काढायचा. सचिनने शेवटच्या षटकात सहा धावांपेक्षा कमी धावाचं आव्हान रोखण्याची कामगिरी दोनदा केली आहे. ‘९३ हीरो कपच्या सेमी फायनलला आफ्रिकेविरुद्ध इतर वेगवान गोलंदाजांची षटकं शिल्लक असूनही अझहरने तेंडुलकरच्या हाती चेंडू दिला आणि आपल्या स्किपरचा विश्वास सार्थ ठरवत पाच धावा रोखुन अंतिम फेरीत भारताला पोहोचवले.
रोहितचं जसं इडन गार्डनवर विशेष प्रेम आहे तसंच एक गोलंदाज म्हणून सचिनचं कोचीच्या मैदानावर विशेष प्रेम. आपल्या दोन ‘5 wicket haul’ त्याने ह्याच मैदानावर घेतल्यात. कोलकातावरून आठवलं..2001 सालची कोलकत्ता टेस्ट द्रविड लक्ष्मणच्या भागीदारीमुळे हरभजनच्या हॅट्रिकमुळे लक्षात राहते परंतु सचिनच्या ‘त्या’ स्पेलला कमी लेखून चालणार नाही. हेडन गिलख्रिस्ट वॉर्न यांच्या18 चेंडूच्या अंतरात विकेट घेत सामन्याचे चित्र पालटले. तेंडुलकर एक हुशार गोलंदाज होता. त्याच्याकडे ऑफ स्पिन आणि लेगस्पिन दोन्ही शस्त्र होती. मोइन खानचा दिवसाच्या शेवटच्या चेंडूवरर काढलेला त्रिफळाचीत बघा. अक्षरशः गंडलाय मोईन. अनेक दिग्गज फिरकीपटूंपेक्षा याचे चेंडू जास्त वळत.
१५४ वनडे विकेट आणि ४६ कसोटी विकेट हे काही महान गोलंदाजाचे आकडे वाटत नसले तरी सचिनने २००३ नंतर अजून गोलंदाजी केली असती आणि दुखापतीनी सोबत केली नसती तर ह्याचा पण कॅलीस, जयसुर्या प्रमाणे २५० विकेट झाल्या असत्या तरी एका पार्ट टाईम गोलंदाजासाठी हे आकडे नक्कीच चांगले आहेत. पुढे युवी, रैना, सेहवाग यांनी त्यांच्या खांद्यावरचा गोलंदाजीचा भार घेतल्याने सुद्धा त्याला गोलंदाजी करण्याची संधी कमीच मिळाली. कधी कधी वाटतं लिलीचं न ऐकता बॉलर बनला असता (फास्ट किंवा स्पिन) तरीही काहीतरी उल्लेखनीय करून गेलाच असता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लाॅर्ड्सवर गांगुलीने या खेळाडूला दिला होता टी-शर्ट काढण्याचा सल्ला
-समुद्रात जहाज फुटल्याने सोबर्स यांच्या वडिलांचे अपघातात झाले होते निधन
-जगातील सर्वात जास्त चर्चा झालेली सर्वात वेगवान क्रिकेट लीग होण्याची शक्यता