fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे ५ सिग्नेचर शाॅट्स

-ज्ञानेश रानडे
प्रत्येक फलंदाजाची शैली वेगवेगळी असते, त्यानुसार त्याचे आवडते आणि प्रभुत्व असणारे शॉटस् सुध्दा वेगवेगळे असतात. कुणी सौरव गांगुली सारखा फक्त ऑफ साईडचा देव असतो किंवा स्टीव्ह स्मिथसारखा जवळपास प्रत्येक बॉल लेग साईडला मारणारा असतो. पण सचिन तेंडूलकर हे एक असे रसायन होते ज्याच्याकडे पुस्तकातले सगळेच्या सगळे शॉटस् होतेच तसेच पुस्तकाबाहेरच्या शॉट्सचा शोध लावण्याइतकी प्रतिभा सुध्दा होती.

आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने सर्व शॉट असे काही घटवले होते की कोणत्याही बॉलरकडे त्याला जखडून ठेवण्याची कुवतच नव्हती. खराब चेंडूना सीमापार सर्वच फलंदाज धाडतात परंतू चांगल्या चेंडूना सहज फटकावण्याची किमया सचिनच करू जाणे.
सचिनचे असे काही ‘सिग्नेचर शॉटस्’ होते जे फक्त त्यानेच मारावे आणि आपण आनंद लुटावा.

सचिनचा ‘स्टेट ड्राईव्ह’
सचिन आणि स्ट्रेट ड्राईव्ह यांचे नाते असे काही होते की बॉल सचिनच्या सुताइतक्या सरळ बॅटवर आपसूक येऊन लागायचा आणि मग पट्टीने पण मारता येणार नाही इतक्या सरळ रेषेत सीमापार व्हायचा..(अर्थात नॉन स्ट्रायकर एंडचे स्टंप चुकवून). हा शॉट मारताना सचिनचे टायमिंग जबरदस्त असायचे. बऱ्याचदा फक्त एक फॉरवर्ड पुश असायचा. जगभरातल्या प्रत्येक गोलंदाजाने आणि खेळपट्टीने सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हची नजाकत अनुभवली आहे.

सचिनचा ‘बॅकफूट कव्हर ड्राईव्ह’
कव्हर ड्राईव्ह हा डोळ्यांना अतिशय सुख देऊन जाणारा फटका आहे मग तो कोणत्याही  फलंदाजाने मारला तरी. सचिनचा कव्हर ड्राईव्ह खास होताच पण त्याचा बॅकफूट कव्हर ड्राईव्ह खासमखास असायचा. माझ्यामते हा क्रिकेटमधील सर्वात अवघड फटका असेल. ऑफस्टंपबाहेरील बाऊंस होणारा (शॉर्ट ऑफ)गुड लेंथ बॉल मारणे म्हणजे खरं तर अपघाताला आमंत्रण देणेच.

असा चेंडू बॅटची कड घेऊन कधी स्लिपच्या कुशीत जाऊन विसावेल कळणार पण नाही. पण सचिनच्या बाबतीत असा चेंडू म्हणजे बॅकफूटवर जाऊन टाचा वर करून हाय एल्बोनिशी प्रेमाने सीमापार धाडण्यायोग्य. हा शॉट मारताना सचिनला पाहणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असायचा. अजूनही त्याने २००३ वर्ल्ड कपमध्ये वसिम अक्रमला मारलेला  बॅकफूट कव्हर ड्राईव्ह डोळ्यासमोर जसाच्या तसा तरळतो आहे.

सचिनचा ‘फ्लिक’
पायावर आलेल्या चेंडूसाठी सचिनचे एकच तत्व होते ‘चूकीला माफी नाहीच’. सचिन असे चेंडू डोळे बंद करून देखील सीमापार धाडायचा. परंतू वकार युनुस,वसिम अक्रम सारखे तेज गोलंदाज धडधडत इन स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग करत यायचे तेव्हा सचिनचा हाच फ्लिक त्यांच्या वेगाला फक्त बाऊंड्रीची दिशा दाखवायचे काम करायचा. ऑफ स्टंप,मधल्या स्टंपवरील चांगले चांगले चेंडू सुध्दा सचिन आपल्या मनगटी कौशल्याने सहज फ्लिक करायचा.
सचिन पुल आणि हूक सुध्दा मस्त मारायचा परंतू कारकिर्दीच्या मधल्या काळात उद्भवलेल्या पाठदुखीने सचिनचे हे फटके जवळपास हिरावूनच घेतले..त्याने वेगवान बाऊंसरर्सना त्याच वेगाने फिरून घातलेले कडक सिक्स स्मरणीय आहेत.

हे झाले काही पुस्तकी शॉटस बद्दल..
पण सचिनमधील संशोधकाने काही नवीन शॉट्सचा शोध लावला. विपरीत परिस्थितीवर मात करताना ‘पॅडल स्वीप’ आणि ‘अप्पर कट’ सारख्या शॉट्सचा सचिनच्या डोक्यामधून उदय झाला.

‘पॅडल स्वीप’ 
सचिनला बाद करण्यासाठी शेन वॉर्न,मुरलीधरन यांसारखे गोलंदाज अनेक करामती करायचे. राऊंड द विकेट सचिनच्या पायावर गोलंदाजी करून त्याला अडकवून ठेवायच्या निगेटीव्ह प्लॅनला सचिनने तितक्याच पॉझिटिव्हली ‘पॅडल स्वीप’ करत उधळवून लावले.

‘अप्पर कट’
डोक्याचा वेध घेण्याऱ्या वेगवान बाऊंसर्सना बॅटने थर्डमॅनची दिशा देणे. आई बाळाच्या गालावरून मायेने हात फिरवते तितक्याच नाजूकपणे हे सर्व सचिन घडवून आणायचा. सध्या टी२० आणि वन डे मध्ये सर्रास वापरला जाणार हा शॉट सचिन टेस्ट मॅचमध्ये मारून स्लिपच्या डोक्यावरून धावा वसूल करायचा.

You might also like