पॅरीस। रविवारचा(२७ जून) दिवस भारतीय तिरंदाजीसाठी सुवर्णमय दिवस होता. एकाच दिवसाच भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषकात एक-दोन नाही तर तब्बल तीन सुवर्णपदकाची कमाई केली. एवढेच नाही, तर तिने केलेल्या या सुवर्णमय कामगिरीचे बक्षीस तिला सोमवारी मिळाले, तिने महिला तिरंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे सध्या तिच्या यशाबद्दल भारतभरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मास्टर-ब्लास्टरकडून खास कौतुक
दीपिका कुमारीने रविवारी तीन सुवर्णपदकं जिंकल्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने तिचे कौतुक करणारे ट्विट केले. त्याने लिहिले की दीपिका जबरदस्त कामगिरी! तू या सर्व यशाची आणि मान्यतेसाठी खरंच पात्र आहेस. तू पॅरीसमध्ये तिरंदाजी विश्वचषकात जी कामगिरी केलीस ती ऑलिंपिकमध्ये जगाला काय पाहायला मिळणार आहे, याची झलक दाखवलीस. तुझ्या यशाबद्दल अभिमान वाटतो आणि तुला टोकियो ऑलिंपिकसाठी खूप शुभेच्छा.’
Magnificent performance Deepika! You deserve all the success & recognition.
Your performance at #ArcheryWorldCup in Paris is just a glimpse of what the world shall see at the @Olympics.
Proud of your achievement & wishing you all the very best for the #TokyoOlympics. pic.twitter.com/eexF4snzel
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 28, 2021
जुलै महिन्यात टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत दीपिका भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. टोकियो ऑलिंपिकमध्ये दीपिकाकडून पदकाच्या मोठ्या आशा सर्वांनाच असणार आहेत.
एकाच दिवसात जिंकले तीन सुवर्णपदके
दीपाकाने रविवारी वैयक्तिक महिला रिकर्व स्पर्धेत रुसच्या एलिना ओसिपोवाला अंतिम फेरीत पराभूत करत तिसरे सुवर्णपदक जिंकले होते. त्यापूर्वी तिचे त्याचदिवशी पती अतनु दाससह मिश्र रिकर्व गटातून सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिने रविवारी सर्वात पहिले सुवर्णपदक अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांच्यासह महिला रिकर्व संघाकडून जिंकले होते.
दीपिकाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्यपदके जिंकली आहेत. तसेच तिरंदाजी विश्वचषकामध्ये तिने तब्बल १० सुवर्ण, १३ रौप्य आणि ५ कांस्य पदके अशी तिची दैदिप्यमान कामगिरी केली आहे. तसेच तिने साल २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने अवघ्या सोळाव्या वर्षी दोन सुवर्ण पदके मिळवण्याची कामगिरी केली होती. तिला आत्तापर्यंत अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार या मानाच्या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा
राही सरनोबतने पुन्हा उंचावली देशाची मान, नेमबाजी विश्वचषकात जिंकले सुवर्ण