पॅरिस हे अनेकांच्या स्वप्नातील शहर असते. भारतातील लोकांच्या ‘हॉलीडे डेस्टिनेशन’ यादीमध्ये पॅरिसचा नक्कीच समावेश असतो. मात्र, या स्वप्नांच्या शहरात भारताच्या एका महिला तिरंदाजीपटूचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. भारताची ही तिरंदाजीपटू आहे दीपिका कुमारी. २७ जून २०२१ आणि २८ जून २०२१ या चोवीस तासाच्या काळात या खेळाडूसाठी आकाशच ठेंगणे झाले, असे म्हणता येईल.
दीपिका कुमारी कोण?
जे लोक भारताच्या क्रीडाविषयक घडामोडींवर लक्ष ठेवून असतात त्यांच्यासाठी दीपिका कुमारी हे नाव नवीन नाही. रिक्षाचालक वडील आणि सरकारी दवाखान्यात नर्स असलेल्या आईची ही मुलगी वयाच्या अगदी १२ व्या वर्षापासून तिरंदाजीतील भारताचे भविष्य म्हणून ओळखली जाऊ लागली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांनी तिच्यातील प्रतिभा ओळखून तिला २००५ मध्ये प्रसिद्ध अर्जुन अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
भारताच्या दिग्गज तिरंदाज मानल्या जाणाऱ्या बोंबायल्या देवी आणि डोला बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात तिने आंतरराष्ट्रीय तिरंदाजीला सुरुवात केली. मागील ११-१२ वर्षाच्या कारकिर्दीत तिने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्रीसारखे नागरी पुरस्कार देखील तिला मिळाले. मात्र, भारतात ज्याप्रकारे क्रिकेटच्या खेळाडूंना लोकप्रियता मिळते तशी लोकप्रियता तिला कधीच मिळाली नाही.
आंतरराष्ट्रीय पदकांची केली लयलूट
नवी दिल्ली येथे आयोजित झालेल्या २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने अवघ्या सोळाव्या वर्षी दोन सुवर्ण पदके मिळवत खळबळ उडवली होती. त्यानंतर, ती सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत राहिली. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्यपदके, आजतागायत तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये तब्बल १० सुवर्ण, १३ रौप्य आणि ५ कांस्य पदके अशी तिची दैदिप्यमान कामगिरी राहिली आहे. आशियाई स्पर्धांमध्ये देखील तिची कामगिरी यशस्वी अशीच राहिली. मात्र, यादरम्यान २०१२ लंडन ऑलिंपिक व २०१६ रियो ऑलिंपिकमध्ये तिच्या पदरी निराशा पडली. रियो ऑलिंपिकनंतर तिच्या कामगिरीत कमालीची घसरण झाली आणि ‘दीपिका पर्व’ संपले असे सर्वांनी गृहीत धरले.
दीपिकाची फिनिक्स भरारी
मागील दोन-तीन वर्षात दीपिका तिरंदाजी विश्वात कुठेतरी मागे पडताना दिसली. तिला दुखापतींनी ग्रासले. याच दरम्यान तिने भारताचा पुरुष तिरंदाज अतानु दास याच्याशी लग्नगाठ बांधली. दीपिका पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार का? या प्रश्नाचे उत्तर तिने लवकरात लवकर आणि अत्यंत चोख दिले.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या स्टेज-३ तिरंदाजी विश्वचषकात ती भारतीय पथकासह सहभागी झाली. २७ जून रोजी ती सहभागी होत असलेल्या तिन्ही स्पर्धा खेळवल्या जाणार होत्या. सकाळच्या सत्रात तिने महिला सांघिक प्रकारात कोमलिका बारी व अंकिता भक्त यांच्यासह रिकर्व स्पर्धेत तिने दिवसातील पहिले सुवर्ण जिंकले. दिवसाच्या दुसऱ्या स्पर्धेत ती आपला जीवनसाथी अतानु दास याच्यासोबत मिश्र रिकर्व स्पर्धेत दुसरे सुवर्ण पटकावले. दिवसात दोन सुवर्ण जिंकल्यानंतर वैयक्तिक प्रकारातील सुवर्ण दीपिका जिंकणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, तिने सर्वांची शंका दूर करत तिसऱ्यांदा सुवर्णवेध घेतला. अवघ्या पाच तासांमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी दीपिकाने करून दाखवली. या कामगिरीचे बक्षीस म्हणून दुसऱ्या दिवशी तब्बल ९ वर्षानंतर ती महिला तिरंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली.
झारखंडची गोल्डन गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २७ वर्षीय दीपिकाने २३ जुलैपासून टोकियो येथे सुरू होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा जागवल्या आहेत. ती वैयक्तिक प्रकारात सहभागी होणारी एकमेव महिला तिरंदाज आहे. दोन ऑलिंपिकमध्ये चुकलेला नेम तिने साधावा आणि भारताच्या पदरात एका ऐतिहासिक सुवर्णपदकाचे दान टाकावे, अशी अपेक्षा सर्व भारतवासी तिच्याकडून बाळगतायेत.
महत्वाच्या बातम्या:
गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण
राही सरनोबतने पुन्हा उंचावली देशाची मान, नेमबाजी विश्वचषकात जिंकले सुवर्ण





