भारतीय संघाचा माजी महान फलंदाज, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा तसा स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीतील खासगी गोष्टींची खुलेपणाने चर्चा करत नाही. मात्र, ‘क्रिकेट डॉट कॉम’ वर गप्पा मारत असताना सचिनने त्याच्या करिअरमधील काही अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने 1997 साली वेस्ट इंडीज संघाविरुद्ध झालेल्या एका सामन्याचा उल्लेख केला.
सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत असताना, वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या त्या सामन्याबाबत एक महत्वपुर्ण खुलासा केला आहे. आपण बाद नसतानाही बाद असल्याचा निर्णय तेव्हा अंपायरने दिला होता. जो सामना पुढे भारतीय संघाने गमावला होता. मात्र, तरिही त्या सामन्यातील खेळी आपण कधीच विसरु शकणार नसल्याचेही सचिनने म्हटले आहे.
काय म्हणाला सचिन…
“मी तेव्हा आक्रमक फलंदाजी करत होतो. माझी वैयक्तिक धावसंख्या 44 वर पोहचली होती. मात्र, कर्टली एम्ब्रोसच्या एका चेंडूवर मी बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला. परंतु पंचांचा तो निर्णय चुकीचा होता. पावसाच्या व्यत्ययामुळे अगोदरच तो सामना प्रभावित झाला होता. पुढे जाऊन तो सामना आम्ही हरलो देखील. मात्र, अतिशय कठीण परिस्थितीत मी तेव्हा फलंदाजी केली होती. त्यामुळे त्या सामन्यातील माझी खेळी मला माझ्या कारकिर्दीतील एक महत्वपुर्ण खेळींपैकी एक वाटते” असे सचिन तेंडुलकरने ‘क्रिकेट डॉट कॉम’ वर बोलताना सांगितले.
सचिनने उल्लेख केलेल्या ‘त्या’ सामन्यात नेमके काय झाले होते ?
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघाविरुद्धचा तो सामना 1997 साली झाला होता. वेस्ट इंडीज संघाची गोलंदाजी तेव्हा अतिशय उच्च दर्जाची होती. कर्टली एम्ब्रोस, कर्टनी वॉल्श, इयान बिशप आणि फ्रँकलीन रोज, यांसारखे दिग्गज गोलंदाज तेव्हा फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडवत असायचे.
सचिन तेंडूलकरने ज्या सामन्याचा उल्लेख केला, तो सामना पावसामुळे अगोदरच प्रभावित झाला होता. अशा कठीण परिस्थितीत देखील सचिन तेंडुलकरने खेळपट्टीवर तग धरुन गोलंदाजांचा सामना केला. तसेच आक्रमक फलंदाजी करत सचिनने 43 चेंडूंत 44 धावा केल्या होत्या.
सामना ऐन भरात असताना, अगदी मोक्याच्या ठिकाणी अंपायरने मात्र एक चुकीचा निर्णय देत त्या सामन्याचे रुपडे पालटून टाकले. तो सचिनबाबत होता, ज्यात सचिनला बाद नसतानाही पंचांनी बाद घोषीत केले.
पंचांनी सचिनला ‘असे’ केले बाद घोषीत…
कर्टली एम्ब्रोस हा वेस्ट इंडीज संघाचा जलदगती गोलंदाज आपले षटक टाकत होता. तेव्हा त्याच्या चेंडूवर सचिन यष्टिरक्षकाकरवे बाद झाला असल्याचे अंपायरने घोषीत केले. अंपायरच्या त्या निर्णयाचे सचिनलाही आश्चर्य वाटले होते. कारण सचिन आऊट झालेला नव्हता. मात्र, पंचांनी बाद ठरवल्याने सचिनला मैदान सोडावे लागले होते.
पुढे हा सामना भारतीय संघाने गमावला. भारतीय संघाचे सर्व खेळाडू 179 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडीज संघाला 146 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. जे आव्हान वेस्ट इंडीज संघाने ८ विकेट्स व ३१ चेंडूत राखत सहज पुर्ण केले होते.
भारतात सध्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक खेळाडू ऑनलाईन माध्यमातून गप्पा मारताना दिसत आहेत. त्यातच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सहभाग घेत, आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला आहे.