अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. ही मालिका टी२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्हीही संघांनी या मालिकेकडे सराव मालिका म्हणून देखील पाहिले आहे. भारतीय संघाने या मालिकेदरम्यान काही प्रयोग करत युवा खेळाडूंना संधी दिली होती. अशातच माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने टी२० विश्वचषकासाठी तयार असलेल्या दोन युवा खेळाडूंचे नाव सुचवले आहे.
भारतीय संघाने शनिवारी (२० मार्च) इंग्लंडविरुद्धचा ५ वा टी२० सामना जिंकत मालिकेत ३-२ असा विजय मिळवला. या मालिकेतून ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दोघांनीही या मालिकेतील आपापल्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती.
त्यामुळे त्यांचे कौतुक करताना सचिनने म्हटले होते की “हे दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत यात काही शंकाच नाही. निवड समितीसाठी हा एक मोठा प्रश्न असणार आहे. परंतु, माझ्यामते जगभरातील सर्व मुख्य खेळाडूंविरोधात खेळल्यानंतर हे खेळाडू टी२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहेत.”
तसेच तो पुढे म्हणाला, “सूर्यकुमार आणि इशान हे खूप उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी सूर्यासोबत खूप वेळ घालवला आहे. तो चांगली कामगिरी करत होता. शेवटच्या आयपीएल हंगामापूर्वी जेव्हा ईशान किशन नेटमध्ये सराव करीत होता, तेव्हा खूप गोष्टी होत्या, ज्या कोणाच्याही नजरेत येऊ शकल्या असत्या. तो आपली बॅट स्विंग (उजवीकडे) आणण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच तो मानसिकदृष्ट्या स्थिर होता. तिथून, त्यानी केलेली प्रगती उल्लेखनीय आहे.”
आयपीएल स्पर्धेत ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. तसेच सचिन मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. तसेच ईशान आणि सुर्यकुमारला आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स या दोघांचाविरुद्ध खेळल्याचा फायदा इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत झाला आहे. सूर्यकुमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरला षटकार लगवला होता.
याबाबत सचिन म्हणाला, “आयपीएलने अशा खेळाडूंना परदेशी गोलंदाजांविरुद्ध खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. देशासाठी खेळण्यापूर्वी या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळता येते.”
महत्त्वाच्या बातम्या –
फायनलमध्ये सचिन तेंडुलकरच्या टीम इंडियाला पराभूत करु, ‘या’ श्रीलंकन खेळाडूने व्यक्त केला विश्वास
‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ
टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक