ऑस्ट्रेलिया दौर्यावर ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असलेल्या भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेऊनही दुसर्या डावात भारतीय फलंदाजीने अवघ्या ३६ डावात राम म्हंटला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सामन्यात सहज विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
मात्र मालिकेतील तीन सामने अजूनही बाकी असल्याने भारतीय संघाला पुनरागमनाची संधी आहे. याच दृष्टीने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने संघाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यासह फलंदाजांनी बचावात्मक फलंदाजी टाळावी, असे तेंडुलकरने सुचवले आहे.
भारतीय फलंदाजांमध्ये फुटवर्कचा होता अभाव
पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघांच्या फलंदाजीबाबत बोलताना सचिन म्हणाला, “पहिल्या डावातील २४४ ही धावसंख्या अॅडलेडच्या खेळपट्टीच्या दृष्टीने उत्तम होती. ऑस्ट्रेलियन संघाचा डाव १९१ धावांवर रोखत गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी बजावली. मात्र पहिल्या डावातील फलंदाजीची पुनरावृत्ती करण्यात आपण अपयशी ठरलो. भारतीय फलंदाजांमध्ये स्पष्टपणे फुटवर्कचा अभाव असल्याचे दिसून आले. ते फ्रंटफुटवर खेळण्याऐवजी क्रीज मध्येच थांबणे, पसंत करत होते. मात्र या बचावात्मक पवित्र्यानेच नुकसान झाले.”
दुसर्या सामन्यात या चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मतही सचिनने व्यक्त केले. भारतीय फलंदाजांनी फ्रंटफुटवर खेळण्यास प्राधान्य द्यावे असे सांगताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी फ्रंटफुटवर खेळणे गरजेचे असते. तुम्ही शरीरापासून दूर असलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, तर चेंडू हमखास बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात जाणार. त्यामुळे फलंदाज फ्रंटफुटवर खेळले तर त्यांना स्विंग टाळून चेंडूच्या नजीक जाऊन फटका मारणे शक्य होईल आणि बॅट-पॅडमधील गॅपही टाळता येईल.”
खराब चेंडूंवर बाद होणे टाळावे
“भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांना दबावाची परिस्थिती हाताळण्याचे अनुभव आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा यांनी अनेक वेळा अशा परिस्थितीचा सामना केला आहे. मात्र तुम्हाला कधी कधी नशिबाची साथ नसेल तर चमत्कारिक परिस्थिती देखील निर्माण होते”, असे पहिल्या कसोटीतील भारतीय फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलताना सचिन म्हणाला. मात्र फलंदाजांनी खराब चेंडूंवर आपली विकेट बहाल करणे टाळावे, असा सल्लाही सचिनने दिला.
दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका वेगळी हवी होती
भारतीय संघांची ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कार्यक्रम पत्रिका काहीशी वेगळी असायला हवी होती, असेही यावेळी सचिन म्हणाला. “भारतीय संघ फेब्रुवारी महिन्यांनंतर कसोटी सामना खेळला नव्हता. त्यामुळे भारताने आधी टी-२०, त्यानंतर वनडे आणि मग कसोटी मालिका खेळायला हवी होती. यामुळे भारताला कसोटीची तयारी करण्यासाठी योग्य दिशा मिळाली असती”, असे सचिन म्हणाला.
येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी सचिनने दिलेला हा कानमंत्र भारतीय फलंदाजांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
संबंधित बातम्या:
– तुझ्या पत्नीला माझ्या शुभेच्छा दे, स्टीव स्मिथने विराटला पहिल्या कसोटीनंतर दिला संदेश
– विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार
– व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत