---Advertisement---

विराट कोहलीसाठी दिवस-रात्र कसोटीत फायदेशीर ठरला सचिन तेंडूलकरचा हा सल्ला

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2019 1:54 PM
---Advertisement---

कोलकाता। भारतीय संघाने काल(24 नोव्हेंबर) इडन गार्डनवर बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने  194 चेंडूत 136 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार मारले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 27 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 70 वे शतक आहे. पण ही खेळी करण्याआधी विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरशी दिवस-रात्र कसोटी संदर्भात चर्चा केली होती.

याबद्दल विराटने सामना संपल्यानंतर सांगितले की ‘मी सामन्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) संध्याकाळी सचिनशी बोललो आणि त्याने एक मनोरंजक मुद्दा सांगितला: दिवस-रात्र कसोटीत तुम्ही दुसऱ्या सत्रात नेहमीच्या कसोटी क्रिकेटमधील सकाळच्या सत्राप्रमाणे खेळले पाहिजे.’

‘जेव्हा अंधार व्हायला लागतो तेव्हा गुलाबी चेंडू स्विंग आणि सीम करण्यास सुरवात करतो. गुलाबी चेंडूच्या सामन्यात पहिल्या सत्रामध्ये नियमीत कसोटी क्रिकेटनुसार दुसऱ्या सत्राप्रमाणे खेळ करायचा आणि दुसरे सत्र सकाळच्या सत्राप्रमाणे तर शेवटचे सत्र संध्याकाळसारखे असेल.’

पुढे विराट म्हणाला, ‘योजनेत बदल होतो, त्यामुळे रणनीती आणि वेळही बदलते. फलंदाज म्हणून तुमच्यासाठी सर्वकाही बदलतते. जरी खेळपट्टीवर स्थिर असलो आणि चांगली फलंदाजी करत असाल तरीही, अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर आपण अडचणीत येऊ शकतो.’

‘चेंडू खेळपट्टीवरुन वेगाने येत होता, तो दुसऱ्या सत्राच्या पहिल्या तासात अधिक स्विंग होत होता आणि संध्याकाळपर्यंत सीम होत होता. सुदैवाने, जेव्हा मैदानावरील लाईट्स चालू झाल्या त्यानंतर मी मैदानात गेलो होतो, त्यामुळे मला त्रास झाला नाही. परंतु मला असे वाटते की भविष्यातही हे आणखी एक आव्हान असेल.’

या सामन्यातील विजय हा भारताचा कसोटीमधील सलग 7 वा विजय होता. त्यामुळे सलग 7 कसोटी सामने जिंकणारा विराट हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---