कोरोना विषाणूच्या भयंकर साथीमुळे जग हादरले आहे. अनेकांना आपल्या जिवलगांचे मृत्यू पाहावे लागत आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील याला अपवाद नाही. नुकतेच कोरोना विषाणूमुळे सचिनने आपला मित्र गमावला आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले विजय शिर्के यांचे शनिवारी (१९ डिसेंबर) कोरोना आजारामुळे निधन झाले. त्यांनी ५७व्या वर्षी ठाणे इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.
विजय शिर्के यांनी ऐंशीच्या दशकात सनग्रेस मफतलाल संघासाठी वेगवान गोलंदाज म्हणून खेळले होते. या संघात त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी देखील खेळले होते.
विजय शिर्के यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थी खेळाडू यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. विनोद कांबळी यांनी ट्विट करत विजय यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. “अतिशय वाईट बातमी. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे. हॅरिस शील्ड मध्ये मी आणि सचिनने विश्वविक्रमी भागीदारी केल्यानंतर आम्हाला सनग्रेस मफतलाल संघात सामील करून घेण्यात आले. संदीप पाटील त्या संघाचे कर्णधार होते आणि विजय शिर्के देखील त्या संघाचा भाग होते. त्याच काळात आमची मैत्री झाली. विजय अतिशय उत्तम वेगवान गोलंदाज होता आणि तितकाच उत्तम माणूस देखील. तो कायमच इतरांच्या मदत करण्यासाठी तत्पर असे”, असे कांबळी म्हणाले. त्याचप्रमाणे तुषार देशपांडे, सलील अंकोला यांनीही विजय शिर्के यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
Extremely sad after knowing the sad demise of Vijay Shirke. His contribution in my early life has been invaluable. Much strength to his family and may his soul rest in peace pic.twitter.com/dK2jghztz7
— Vinod Kambli (@vinodkambli349) December 20, 2020
My heart sank when I got the news that Vijay Shirke Sir departed this life due to Covid-19. Deepest condolences to his family and my prayers, may he find peace wherever he is🙏🏼 pic.twitter.com/vm9RNPYqcK
— Tushar Deshpnde (@TusharD_24) December 20, 2020
याआधीही कोरोनामुळे सचिनने गमावला होता मित्र
काही काळापूर्वी सचिन तेंडुलकरने आपला जिवलग मित्र अवी कदम याला देखील गमावले होते. अवी कदम यांचा मृत्यूदेखील कोरोना विषाणूमुळेच झाला होता. त्यानंतर आता विजय शिर्के यांनादेखील कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार शिर्के यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. परंतु नंतर अचानक त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि त्यांचे निधन झाले.
विजय शिर्के यांचे मुंबई क्रिकेटसाठी महत्वाचे योगदान होते. त्यांनी मुंबईच्या १७ वर्षाखालील संघासाठी दोन वर्षे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते. त्यामुळे त्यांचे निधन मुंबई क्रिकेट वर्तुळासाठी धक्कादायक आहे.