चेन्नई : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रविवारी देखील दमदार खेळाचे प्रदर्शन करताना वेटलिफ्टिंग, नेमबाजी या दोन खेळांत सुवर्णपदके जिंकली. टेबलटेनिस स्पर्धेत मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या तीन मुलीनी प्रवेश केला. टेनिसमध्ये देखील महाराष्ट्राच्या खेळाडूनी कसब दाखविताना मुलींच्या आणि मुलांच्या अशा दोन्ही गटातून उपांत्य फेरी गाठली आहे. सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या खेळाडूनी २ सुवर्ण, १ रौप्य अशी दमदार कामगिरी बजावली आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये साईराज परदेशी याचा राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णवेध
महाराष्ट्राच्या साईराज परदेशी याने अतिशय आत्मविश्वास दाखवीत मुलांच्या ८१ किलो गटात राष्ट्रीय विक्रम नोंदवित सोने लुटले. मात्र महाराष्ट्राच्या भूमिका मोहिते हिला वेटलिफ्टिंगमधील ५९ किलो वजनी गटात सोनेरी यश साधता आले नाही. तिला रौप्य पदक मिळाले.
साईराज याने स्नॅच प्रकारामध्ये १२४ तर क्लीन व जर्कमध्ये १६२ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये त्याने मध्यप्रदेशचा खेळाडू अजय बाबू याने गतवर्षी नोंदविलेला १६१ किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला. स्नॅच प्रकारामध्ये पहिल्या दोन्ही प्रयत्नांमध्ये साईराज याला वजन उचलता आले नव्हते. तथापि तिसऱ्या प्रयत्नात त्याने १२४ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात १५३ किलो वजन उचलून त्याने झकास सुरुवात केली. त्यानंतर १५९ किलो व १६२ किलो असे वजन उचलून त्याने सोनेरी पदकावर नाव कोरले.
साईराज हा मूळचा मनमाड येथील खेळाडू असेल प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. गेली तीन वर्षे तो संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात तृप्ती पराशर व विजय रोहिला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो सामान्य कुटुंबातील खेळाडू असून त्याची बहीण पूजा व भाऊ जयराज हे देखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. तो सध्या मनमाड येथील सप्रे विद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहे. गतवेळी त्याने कास्यपदक मिळवले होते तसेच त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये झालेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक तर कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. सुवर्णपदक मिळविण्याबरोबरच राष्ट्रीय विक्रम नोंदवण्याचे ही माझे ध्येय होते आणि हे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे साईराज याने सांगितले.
वेटलिफ्टिंगमध्ये भूमिका मोहितेचे सुवर्णपदक हुकले, रौप्य पदकावर समाधान
भूमिका हिला ५९ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅच या प्रकारामध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्क मध्ये ९७ असे एकूण १७२ किलो वजन उचलले. क्लीन व जर्क मध्ये जर तिने शेवटच्या प्रयत्नात १०१ किलो वजन उचलले असते तर तिला सुवर्णपदक मिळाले असते. उत्तर प्रदेशच्या सगुणा राव १७५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
भूमिका ही कुरुंदवाडजवळील खेरवाड या गावातील खेळाडू असून तिला प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिने अरुणाचल प्रदेश मध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. गेली पाच वर्षे ती वेटलिफ्टिंग मध्ये करिअर करीत असून सध्या ती एस. के.पाटील महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. तिने जागतिक युवा स्पर्धेत चौथे स्थान मिळविले होते. तिच्या वडिलांचा दुग्ध व्यवसाय असून तिला या खेळासाठी पालकांचे भरपूर सहकार्य मिळत आहे.
नेमबाजीत ईशाचे लक्षवेधी दुसरे सुवर्ण
चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील १० मीटर एयर रायफल प्रकारात अखेरच्या क्षणापर्यंतरंगलेल्या चुरशीच्या लढतीत ८ गुणांनी महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेने सुवर्णपदक खेचून आणले.
गुरुनानक महाविद्यालयच्या शूटिंग रेंजवर तुल्यबळ असणाऱ्या मध्यप्रदेशच्या गौतमी भानोतने ईशाला अंतिम फेरीत झुंजविले. अखेर लौकिकास साजेसा खेळ करीत महाराष्ट्राच्या ईशाने २५३.८ गुण मिळविताना पदकाची बाजी मारली. गौतमीने २५३ गुणांसह रौप्य पदक राखले. कर्नाटकच्या अनुष्काला कांस्यपदकवर समाधान मानावे लागले. चेन्नईतील स्पर्धेत पार्थ माने सोबत खेळताना तीने मिश्र दुहेरीतही सुवर्ण पदक पटकावले होते.
ईशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये दमदार कामागिरी केली असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ऑलिम्पियन सुमा शिरूर यांच्या मुंबईतील लक्ष्य अकादमीत सराव करते. अमरावतीमध्ये सहाव्या वर्षापासून खेळाचा श्री गणेशा करणाऱ्या ईशाने चार आंतरराष्ट्रीय पदके जिंकली असून युवा स्पर्धेत तिने विक्रमाची नोंद केली आहे. ईशाने सलग दुसऱ्यांदा खेलो इंडियात पदकाचा करिश्मा घडविला.
टेनिसच्या दुहेरीत मुले व मुली दोघेही उपांत्य फेरीत
चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या दुहेरीत सोनल पाटील व ऐश्वर्या जाधव यांच्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी दिल्लीच्या रिया सचदेव व याशिका यांना ६-३, ६-० असे पराभूत केले. सुरुवातीपासून दोघींनी आक्रमक खेळ करताना दिल्लीच्या खेळाडूंना पुनरागमनाची संधीच दिली नाही. लढतीमध्ये सोनल आणि ऐश्वर्या यांनी जबरदस्त समन्वय राखताना दिल्लीच्या रिया आणि याशिका यांना जखडून ठेवले.
महाराष्ट्राच्या रुमा गायकायवारी व अस्मी अडकर यांनी टायब्रेकरमध्ये तामिळनाडूच्या दिया रमेश व श्री शैलेश्वारी यांना ६-१, ७-६ (७-३) पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. रुमा व अस्मी यांनी आजच्या लढतीत जबरदस्त खेळ केला. यामुळे तामिळनाडूचे दोन्ही खेळाडू निष्प्रभ झाले.
मुलांच्या गटात काहीर वारीक व तनिष्क जाधव यांना पुढची चाल मिळाल्याने त्यांनी थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांची लढत दिल्ली व उत्तर प्रदेश यांच्या लढतीच्या विजेत्याबरोबर होणार आहे.
टेबलटेनिसमध्ये पृथा, सायली, रिशा यांची उपांत्य फेरीत धडक
मुलींच्या एकेरीत पृथा वर्टीकर, सायली वाणी व रिशा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्याना पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे महाराष्ट्राला टेबलटेनिसमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य असे तीनही पदक मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत पृथा वर्टीकरने हरयाणाच्या सुहाना सैनीला १२-१०, ६-११, १०-१२, ११-३, ११-६ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. अतितटीच्या या लढतीमध्ये पृथाने शेवटी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करताना सुहानाला पराभूत केले. महाराष्ट्राच्या सायली वाणीने पश्चिम बंगालच्या सौमित्रा दत्ताला ११-८, ११-३, ११-९ तर रिशा मीरचंदानीने तामिळनाडूच्या काव्यश्री भास्करला ११-९, ५-११, ११-५, ११-५ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्राच्या तानिशा कोटेला मात्र पश्चिम बंगालच्या नंदिनी शहा हिच्याकडून ११-७, ८-११,१०-१२, १०-१२ असा पराभव स्वीकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
ENG vs IND । ‘हा विजय सर्वात भारी…’, हैदराबाद कसोटी इंग्लिश कर्णधारासाठी ठरली खास, वाचा अजून काय म्हणाला
IND vs ENG । भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंसाठी वाजली धोक्याची घंटा! पुढच्या कसोटीतून होऊ शकतो पत्ता कट