भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये चौथा सामना अत्यंत रोचक वळणावर पोहोचला आहे. रिषभ पंत (Rishbh Pant) पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना जखमी झाला होता. वाटत होतं की तो पुन्हा फलंदाजीसाठी येणार नाही. पण त्याने सगळ्यांना आश्चर्यचकित करत पुन्हा मैदानात उतरून जिद्दीची खेळी साकारली आणि प्रेक्षकांची मने जिंकली. म्हणूनच जेव्हा तो बाद झाला, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत त्याला सलाम करत होते.
मँचेस्टर कसोटीत रिषभ पंतने पहिल्या दिवशी चांगली फलंदाजी केली. पण, जेव्हा तो 37 धावांवर होता, तेव्हा क्रिस वोक्सच्या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो उभाही राहू शकत नव्हता आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्याच्या पुन्हा फलंदाजीसाठी येण्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) बाद झाल्यानंतर पंत मैदानात आला. जखमी असूनही त्याने धावा केल्या, काही उत्तम फटके मारले आणि अर्धशतकही झळकावलं.
जखमी अवस्थेतही संघर्ष करणाऱ्या पंतचा शेवट जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर झाला. त्याने 54 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. जेव्हा तो बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाने उभं राहून त्याला टाळ्यांनी मानवंदना दिली. पंतच्या या झुंजार खेळीमुळे सगळे चाहते भावूक झाले आणि त्याचं कौतुक केलं. ही खेळी कायम लक्षात राहणारी ठरेल.
भारत दुसऱ्या दिवशी फलंदाजीस उतरला तेव्हा संघाचं लक्ष्य 400 च्या आसपास धावा करायचं होतं. पण ते साध्य होऊ शकलं नाही. भारताने 114.1 षटकांत 358 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (Ben Stocks) 5 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) 3 खेळाडू बाद केले. भारताकडून सर्वाधिक 61 धावा साई सुदर्शनने (Sai surdarshan) केल्या. आता भारतीय गोलंदाजांचं उद्दिष्ट इंग्लंडला शक्य तितक्या कमी धावांवर रोखण्याचं असेल.






