दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१ च्या ४० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने स्वतः उत्कृष्ट फलंदाजी करत शानदार अर्धशतक केले. पण तरीही राजस्थान संघाला विजयापासून दूर रहावे लागले.
संजूशिवाय सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही 36 धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माची गोलंदाजी फोडून काढली. पण सरतेशेवटी, संदीप शर्माने षटकार खाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर जयस्वालला त्रिफळाचीत केले.
https://www.iplt20.com/video/241195/sandeep-s-comeback-to-jaiswal
राजस्थानच्या डावाच्या ९ व्या षटकात ही घटना घडली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संदीप शर्माला जयस्वालने एक उत्तुंग षटकार ठोकला, ज्यामुळे राजस्थानचे सर्व चाहते मंत्रमुग्ध झाले. या षटकारानंतर जयस्वाल आणखी काही मोठे फटके खेळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण संदीपने त्याला पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले आणि अशा प्रकारे जयस्वालची शानदार खेळी संपुष्टात आली.
जोशावर होश पडला भारी
जयस्वाल षटकार मारल्यानंतर जोशात येऊन भान हरपून बसला आणि पुढे जाऊन मोठा फटका मारण्याच्या नादात फुल-टॉस चेंडूवर चकला. चेंडू त्याच्या बॅटची किनार घेऊन यष्टीला लागला आणि त्याचा डाव संपुष्टात आला. बाद होण्यापूर्वी त्याने २३ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या, त्यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकारही मारला होता.
तत्पुर्वी सामन्यात नाणफेक जिंकत राजस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला विकेट लवकर गेल्यानंतर कर्णधार संजूने यशस्वी जयस्वालसोबत अर्धशतकी भागिदारी रचली. जयस्वालने ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार संजू शेवटच्या षतकापर्यंत मैदानात टिकून होता. त्याने ८२ धावांची दमदार खेळी केली. ज्यामुळे राजस्थानने निर्धारित २० षटकात १६४ धावांपर्यंत मजल मारली आणि हैद्राबादला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर, फलंदाजीला आलेल्या हैदराबाद संघाकडून आधी सलामीवीर जेसन रॉयने दमदार ६० धावांची खेळी केल्यानंतर अखेरच्या षटकात उत्कृष्ट फलंदाजी करत कर्णधार केन विल्यमसने नाबाद ५१ धावांच्या मदतीने सामना हैद्राबादला जिंकवून दिला.