2024 महिला टी20 विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यात बराच गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे रनआऊटचा वाद शमला नव्हता, तर आता नवा वाद निर्माण झाला आहे.
या सामन्यात समालोचन करणाऱ्या संजय मांजरेकर यांची जीभ अशा प्रकारे घसरली की, आता यावरून नवा वाद उपस्थित झाला आहे. या घटनेवरून अनेक चाहते बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींनी तर संजय मांजरेकर यांना समालोचनावरून काढून टाकण्याची मागणी केली.
झालं असं की, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीव्हीवर लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान उत्तर भारतीय खेळाडूंवर वादग्रस्त टिप्पणी केली. उत्तर भारतातील खेळाडूंबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं ते म्हणाले. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफबाबत चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. त्यांचे सहकारी समालोचक पंजाबचे माजी खेळाडू आणि संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांच्याबाबत बोलत होते. त्यावर, मी त्यांना ओळखू शकलो नाही, असं मांजरेकर म्हणाले.
मुनीश बाली यांच्याबद्दल मांजरेकर म्हणाले, “माफ करा, मी त्यांना ओळखू शकलो नाही. मी उत्तरेकडील खेळाडूंकडे फारसं लक्ष देत नाही.” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनं हळूहळू त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक युजर्स बीसीसीआयकडे त्यांना कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला 58 धावांनी दारूण पराभव पत्कारावा लागला. या सामन्यादरम्यान बराच गदारोळ झाला होता. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अमेलिया केरनं दीप्ती शर्माच्या लाँगऑफवर फटका मारला आणि एक धाव पूर्ण केली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं चेंडू अडवला मात्र तो क्रिजकडे फेकला नाही. एकेरी धाव पूर्ण होताच अंपायरनं ओव्हर संपवण्यासाठी खेळ थांबवला. याचा फायदा घेत सोफी डेव्हाईन पुन्हा धावू लागली. हे पाहता कौरनं यष्टिरक्षकाच्या दिशेनं चेंडू फेकून तिला धावबाद केलं. परंतु अंपायरने ही विकेट दिली नाही. यावरून बरीच वादावादी झाली.
हेही वाचा –
विकेटही घेतल्या, शतकही ठोकलं! टीम इंडियाला मिळाला नवा अश्विन?
हार्दिक पांड्या बनू शकतो भारताचा टॉप टी20 गोलंदाज, भुवनेश्वर कुमारचा मोठा विक्रम धोक्यात
भारतीय दिग्गजाच्या मुलाची पदार्पणातच शानदार खेळी, अवघ्या 26 षटकांत जिंकवला सामना






