ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला आहे, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या भारतीय संघात मेलबर्न कसोटीसाठी चार बदल करण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि ‘ समालोचक संजय मांजरेकर यांनी या संघनिवडीला ‘दबावाखाली केलेली संघनिवड’ असे संबोधले आहे.
शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज करणार पदार्पण
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने एकूण चार बदल केले आहेत. मोहम्मद शमी दुखापतीमुळे अनुपलब्ध असल्याने त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली आहे. तसेच पृथ्वी शाॅला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर जावे लागले असून त्याच्या जागेवर शुबमन गिलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे गिल आणि सिराज मेलबर्नच्या मैदानावर आपले कसोटी पदार्पण करतील. याशिवाय विराट कोहली मायदेशी परतल्याने त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळाले असून यष्टीरक्षकाच्या जागेवर वृद्धिमान साहाच्या ऐवजी रिषभ पंतला संधी मिळाली आहे.
“दबावाखाली केलेली संघनिवड”
या संघनिवडीवर भारताचे माजी फलंदाज आणि विद्यमान समालोचक संजय मांजेरकर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही निवड बघता भारतीय संघ स्पष्टपणे दबावात असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडप्रमाणेच, सगळ्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. मात्र आता निवड झाली आहे, आता प्रदर्शन करण्याची वेळ आहे. टीम इंडियाला शुभेच्छा”, असे ट्विट मांजेरकर यांनी केले आहे.
Indian team for second Test is clearly an ‘under pressure’ selection. A bit like England, trying to cover all bases. Selection done, it’s execution time now…Good luck India! #BoxingDayTest on @SonySportsIndia
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) December 25, 2020
माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनीही ट्विट करत भारताच्या संघनिवडीवर आपले मत मांडले आहे. या निवडीमागील भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार काय असावा याचे विश्लेषण करताना चोप्रा म्हणाले, “फलंदाजी क्रमाची निवड करताना विराट+शाॅ+साहा = शुबमन+पंत+जडेजा असे गणित भारतीय संघाने केले असावे. तसेच जडेजाला सामील केल्याने तुम्हाला काही बळी मिळविण्याची शक्यता निर्माण होते तसेच क्षेत्ररक्षणातही संधी उपलब्ध होतात.”
The thought while picking this particular batting combination must be:
Shubman+Pant+Jadeja > Kohli+Shaw+Saha.
And you get wickets and gun fielding from Jadeja. #AusvInd— Aakash Chopra (@cricketaakash) December 25, 2020
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केलेले हे चार बदल भारताला मालिकेत पुनरागमन करून देण्यासाठी उपयुक्त ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, हे दोन खेळाडू करणार पदार्पण
– तो काहीही करू शकतो, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
– मायदेशी परतण्यापूर्वी कोहलीने हा संदेश देत वाढवले संघाचे मनोबल; अजिंक्य रहाणेने केला उलगडा