---Advertisement---

जडेजा आणि भोगले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा माजी क्रिकेटपटू करणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे समालोचन

On: शुक्रवार, नोव्हेंबर 20, 2020 10:17 PM
---Advertisement---

कोणत्याही खेळाचे समालोचन करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. खेळाडूबद्दल भाष्य करताना शब्द जपून वापरावे लागतात. मात्र, एका भारतीय समालोचकाला एका क्रिकेटपटूबद्दल केलेल्या विवादास्पद टिप्पणीमुळे बीसीसीआयने समालोचकांच्या यादीतून वगळले होते. आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आगामी मालिकेत ते  समालोचन करताना दिसतील.

संजय मांजरेकर यांचा समालोचकांच्या पॅनलमध्ये समावेश

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर हे बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनेलमध्ये परतले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आगामी मालिकेत ते समालोचन करणार आहेत. इंग्रजी समालोचकांच्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले आहे. मांजरेकर यांच्याव्यतिरिक्त हर्षा भोगले, अजय जडेजा, मुरली कार्तिक आणि अजित आगरकर हेही या पॅनेलमध्ये आहेत.

मांजरेकर यांचे वक्तव्य

समालोचन पॅनेलमध्ये पुनरागमन केल्यानंतर मांजरेकर यांनी म्हटले की, “मला भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समालोचन पॅनेलमध्ये समावेश केल्याने आनंद होत आहे. ही ९ महिन्यांनंतर भारताची पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल. मला आनंद आहे की, या मालिकेदरम्यान मी समालोचन करेल.”

रवींद्र जडेजाबद्दल केले होते वादग्रस्त विधान

मांजरेकर हे 2019-20 च्या हंगामात काही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. सन 2019 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाबद्दल मांजरेकर यांनी केलेल्या टिप्पणीमुळे बराच वादंग उठला होता. त्यांनी जडेजाचे ‘बिट्स अँड पीस’ खेळाडू म्हणून वर्णन केले होते. म्हणजेच टप्प्या-टप्प्यात कामगिरी करणारा खेळाडू.

बीसीसीआयने समालोचकांच्या पॅनलमधून मांजरेकर यांना वगळले

या वादग्रस्त विधानानंतर त्यानंतर ते बीसीसीआयच्या निशाण्यावर आले होते. मांजरेकर यांना बीसीसीआयने समालोचकांच्या पॅनलमधून वगळले होते. मात्र, त्यांना पॅनेलमधून काढून टाकण्यामागील अधिकृत कारण बीसीसीआयने उघड केले नाही.

मांजरेकर यांनी केली सारवासारव

वादग्रस्त विधानानंतर मांजरेकर यांनी सांगितले की, “मी हे विधान समालोचन करताना केले नसून एका एजन्सीला मुलाखत देताना केले होते.”

भोगले यांच्या विश्वासार्हतेवर मांजरेकर यांनी उपस्थित केला प्रश्न

मांजरेकर यांनी प्रख्यात क्रिकेट तज्ज्ञ आणि समालोचक हर्षा भोगले यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानेही वाद उठला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता येथे गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळला गेला. या कसोटी सामन्यादरम्यान मांजरेकर यांनी हर्षा भोगले यांच्यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले होते की, “हर्षा भोगले यांना प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव नाही.”

मांजरेकर यांनी माफी मागण्याची दर्शवली होती तयारी

आयपीएल 2020 सुरू होण्यापूर्वी संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयला पुन्हा कामावर रुजू करण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी बीसीसीआयला पत्र लिहून जाहीरपणे माफी मागण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी म्हटले होते की, “एखाद्या व्यक्तीला त्याच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे वाईट वाटले असेल, तर मी माफी मागण्यासाठी तयार आहे.”

बीसीसीआयला केलेल्या विनंतीचा झाला नाही लाभ

तथापि, मांजरेकरांनी बीसीसीआयला पत्र लिहून समालोचकांच्या पॅनेलमध्ये स्वत:चा समावेश करण्याच्या विनंतीचा फायदा झाला नाही. बीसीसीआयने आयपीएलच्या समालोचकांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला नाही.

मांजरेकर जगातील सर्वोत्कृष्ट समालोचकांपैकी एक

जगातील सर्वोत्कृष्ट समालोचकांच्या यादीत मांजरेकर यांचा समावेश होतो. मागील तीन विश्वचषकात त्यांनी समालोचन केले आहे. सन 1996 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मांजरेकरांनी आयसीसीच्या बर्‍याच स्पर्धेत समालोचन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध समालोचकाचे होणार पुनरागमन; BCCI ने IPL कॉमेंट्री पॅनलमधून केलं होतं बाहेर

आयपीएल समालोचकांच्या यादीतून दिग्गजाला वगळले, आता हर्षा भोगलेसह फक्त…

फेक फॉलोवर्स रॅकेट: ‘या’ प्रसिद्ध क्रिकेट समालोचकाची होणार चौकशी, मुंबई पोलिसांंनी पाठविले समन्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---