संजू सॅमसन पुन्हा एकदा शतकापासून मुकला आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये सलग तिसऱ्या सामन्यात त्याचे शतक हुकले आहे. यावेळी सुद्धा तो ८९ धावा करून बाद झाला. यापूर्वी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्धही तो ८९ धावांवर बाद झाला होता. तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तो ९७ धावांवर बाद झाला होता. संजूला शतक बनवता आले नसले तरी, टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणत्याही फलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
रविवारी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात संजू सॅमसन तुफान फटकेबाजी करत होता. त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. संजू ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून असे वाटत होते की यावेळी तो शतक नक्की पूर्ण करेल. मात्र, १५ व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. जेम्स नीशमच्या फुलटॉस चेंडूवर त्याने लाँग-ऑनला कॅच दिला.
संजू सॅमसनने ४६ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ८ षटकार खेचले. नीशमच्या फुलटॉस चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नातच तो बाद झाला. त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण लाँग-ऑनवर उभ्या असलेल्या कोल मॅककॉन्चीने घेतलेल्या शानदार झेलमुळे त्याला थांबावे लागले. मॅककॉन्ची मैदानात एक पर्यायी (सब्स्टीट्यूट) क्षेत्ररक्षक म्हणून आला होता. जर टीम इंडिया हा सामना जिंकली, तर संजू महत्त्वाच्या तीन सामन्यांमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ची हॅट्रिक करू शकतो.
फायनलमध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. सलामीला आलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी किवी (न्यूझीलंड) गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा संजू सॅमसन हा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांनीच अशी कामगिरी केली आहे. आफ्रिदीने २००९ मध्ये आणि विराट कोहलीने २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये अर्धशतके ठोकली होती. आता संजू सॅमसनचे नावही या यादीत सामील झाले आहे.
सलग तिसऱ्या अर्धशतकासह संजू सॅमसन आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही सामील झाला आहे. या यादीत टीम इंडियाकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. कोहलीने २०१६ आणि २०२१ मध्ये सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर, केएल राहुलने २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये ३ वेळा ५० हून अधिक धावांची खेळी केली होती. त्यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या बाबर आझमने देखील २०२१ मध्ये तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.





