राजस्थान रॉयल्स संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अटीतटीच्या सामन्यात कसा विजय मिळवायचा हे त्यांना चांगलेच जमते. कारण आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अंतिम षटकात पंजाब किंग्स संघाला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती. परंतु कार्तिक त्यागीने अप्रतिम गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला.
या विजयानंतर केएल राहुल निराश होता; तर संजू सॅमसनला भलताच आनंद झाला होता. त्याने सामना झाल्यानंतर शेवटच्या दोन षटकांत कसा सामना बदलला? याचा खुलासा केला आहे.
सामना झाल्यानंतर संजू सॅमसनने म्हटले की, “ही खूप चांगली गोष्ट आहे की, आम्हाला विश्वास होता आम्ही जिंकू शकतो. मलाही विश्वास होताच की, आम्ही जिंकू शकतो. त्यामुळे मी मुस्तफिजुर रहमान आणि कार्तिक त्यागीला शेवटच्या षटकापर्यंत थांबवून ठेवले होते. क्रिकेट खरच मजेशीर खेळ आहे. आम्ही फक्त झुंज देत राहिलो आणि आमच्यात विश्वासही होता. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला माझ्या गोलंदाजांवर खूप विश्वास आहे आणि आम्हाला शेवटपर्यंत झुंज द्यायची होती. त्यामुळे मी त्या दोन गोलंदाजांना थांबवून ठेवले होते. खरं सांगायचं झालं तर, त्या खेळपट्टीवर धावांचा बचाव करताना आम्हाला मजा आली. कारण आमच्याकडे चांगले गोलंदाजी आक्रमण होते. जर आम्ही झेल सोडले नसते तर हा सामना केव्हाच जिंकलो असतो. खेळाडूंनी आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे.”
राजस्थान रॉयल्स संघाने उभारला १८५ धावांचा डोंगर
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत, राजस्थान रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली होती. यशस्वी जयस्वालने ताबडतोड ४९ धावांची खेळी खेळी.तसेच महिपाल लोमरोर याने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली.तर एविन लुईसने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते.
पंजाब किंग्स संघाचा २ धावांनी पराभव
या धावांचा पाठलाग करताना, सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी ताबडतोड सुरुवात करून दिली होती. केएल राहुलने ४९ तर मयंकने ६७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी निकोलस पुरणने देखील ३२ धावांचे योगदान दिले. परंतु पंजाब किंग्स संघाला आव्हानाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला. या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
“हा पराभव पचवणे खूप कठीण”, हातात असलेला सामना गमावल्यामुळे कर्णधार राहुल भावुक
राहुल होता नशिबाच्या रथावर स्वार, ३ वेळा मिळाले जीवनदान, राजस्थानला चूक सुधारणे गरजेचे; नाहीतर…
राजस्थानच्या फलंदाजाचा ९७ मीटरचा ‘मॉन्स्टर’ षटकार, जो ठरला सर्वांचेच आकर्षण; तुम्हीही पाहा