भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ शानदार कामगिरी करत असून सुरुवातीपासूनच पहिल्या चार संघात स्थान टिकवून आहे. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसननेही चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, सॅमसनने नुकताच भारत आणि राजस्थान रॉयल्सचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडबद्दल एक खुलासा केला आहे.
द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बराचकाळ राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. त्यामुळे त्याने संजू सॅमसनबरोबर देखील फलंदाजी केली आहे. सॅमसनने द्रविडबरोबर फलंदाजी करतानाची एक आठवण देखील सांगितली आहे.
सॅमसनने गौरव कपूर होस्ट करत असलेल्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या शो दरम्यान सांगितले की, जेव्हा तो द्रविडबरोबर फलंदाजी करत होता, तेव्हा त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. तेव्हा द्रविडने त्याला सांगितले की, पहिले काही चेंडू खेळ आणि मग शॉट खेळ. पण, सॅमसनच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवरही चौकार निघाला. त्यानंतर मात्र, द्रविडने त्याला सांगितले की मारत राहा.
तसेच द्रविडच्या स्वभावाबद्दलही सॅमसनने सांगितले की, तो सर्वांशी समानच वागतो. त्याचा हा स्वभाव चकीत करण्यासारखा आहे. सॅमसन म्हणाला, ‘राहुल द्रविडची सर्वाच चांगली गोष्ट अशी आहे की, तो राजस्थान रॉयल्सचे संघमालक मनोज बदाले यांच्याबरोबर जसे बोलतो, तसेच तो ग्राऊंड्समनशी देखील बोलतो. मला त्याच्याकडे पाहून असे वाटते की, तो असे कसं करू शकतो. तो दाखवण्यासाठी असे करत नाही, तर तो खरंच प्रामाणिकपणे असे वागतो.’ द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.
याशिवाय सॅमसनने दिवंगत शेन वॉर्नबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, वॉर्न त्याच्या आयुष्यातील सर्व ५२ वर्षे भरभरून जगला आहे. तसेच त्याच्या आठवणी कायम राजस्थान रॉयल्सबरोबर असतील. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएल २००८ हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. तसेच तो काही वर्षे संघाच्या सपोर्ट स्टाफबरोबर देखील जोडला गेलेला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: हार्दिक पंड्याची विकेट घेताच धवनचा जोरदार जल्लोष, फ्लाईंग किस देत केले सेलिब्रेशन
तेवतियाचा चालू सामन्यातच संघसहकारी साई सुदर्शनवर संताप, वाचा नक्की झालं तरी काय
लिव्हिंगस्टोनने चौथ्या क्रमांकावर का केली फलंदाजी? मयंक अगरवालचा मोठा खुलासा