भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला आहे. टीम इंडियाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. परंतु प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयनं कडक भूमिका घेतली आहे. बोर्डानं खराब फॉर्ममुळे झगडणाऱ्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलंय. त्यानंतर आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा भाग असलेले काही खेळाडू येत्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतात.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले काही खेळाडू दुखापतींशीही झुंजत आहेत. यात आता मधल्या फळीतीली फलंदाज सरफराज खानचं नावही समाविष्ट झालं. भारताचा युवा फलंदाज सरफराज खान रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग होता. ‘इंडियन एक्सप्रेस’मधील वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान स्टार फलंदाज सरफराज खानला बरगडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो 23 जानेवारीपासून जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईकडून खेळू शकणार नाही.
खराब फॉर्ममुळे संघर्ष करणारे काही भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटऐवजी आयपीएलला प्राधान्य देत आहेत. त्यांच्याबद्दल बोर्ड कठोर झालं आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिल्याबद्दल बीसीसीआयचा केंद्रीय करार गमवावा लागला होता. अय्यर आणि किशन यांनी त्यांच्या चुकांमधून धडा घेतला आणि चालू हंगामात ते अनुक्रमे मुंबई आणि झारखंडकडून वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळत आहेत.
आता रोहित शर्मा, रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल सारखे खेळाडू देखील देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियात अपयशी झाल्यानंतर रोहित शर्मानं मुंबईसोबत सरावाला सुरुवात केली. याशिवाय रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालनं ते रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे.
हेही वाचा –
अश्विनला निवृत्तीनंतरही क्रिकेट खेळायचं आहे, भविष्यातील प्लॅन जाणून घ्या
रेकाॅर्डब्रेक..! भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी, वनडेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली
“150 किलोपेक्षा जास्त सामानाची गरज…”, भारतीय खेळाडूंवर आकाश चोप्राची बोचरी टीका