ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner ) यांना मार्च २०१८ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी दरम्यान चेंडू छेडछाड केल्याने १ वर्षासाठी तर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टला (Cameron Bancroft) ९ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. क्रिकेट चेंडूबरोबर छेडछाड करत असताना बॅनक्रॉफ्टला कॅमेर्याने पकडले होते आणि त्याचे फुटेज टीव्हीवर स्पष्ट दिसत होते. ड्रेसिंग रूममध्ये बसलेले प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी ताबडतोब पीटर हॅंड्सकॉम्बला (Peter Handscomb) १२ वा खेळाडू म्हणून मैदानात पाठवले आणि बॅनक्रॉफ्टला इशारा दिला.
बॅनक्रॉफ्टने त्याच्या पॅन्टमध्ये ‘सॅन्डपेपर’ लपविला होता. ही गोष्ट पंचांना समजली तेव्हा पंचांनी त्याला बोलावले मग बॅनक्रॉफ्टने त्याचा खिशातून चष्माचे आवरण दाखवले. बॅनक्रॉफ्टला हे माहित नव्हते की जेव्हा तो त्याच्या पॅन्टमध्ये ‘सॅन्डपेपर’ टाकत होता, तेव्हा कॅमेरे अजूनही त्याच्यावरच होते.
नंतर समजले की डेव्हिड वॉर्नरने बॅनक्रॉफ्टला सर्व सांगितले होते. या संपूर्ण योजनेबद्दल त्यावेळीच्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला माहिती होती. वास्तविक, त्यात आणखी बरेच लोक सामील असण्याची शक्यता होती, परंतु वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट या तिघांव्यतिरिक्त कोणाचीही नावे पुढे आली नाहीत.
त्यावेळी अनेकाचे म्हणणे होते की डॅरेन लेहमनचीही (Darren Lehmann) यात मोठी भूमिका असावी. पण तपासादरम्यान डॅरेन निर्दोष असल्याचे आढळले आणि त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. पण एका दिवसानंतर त्यांनीही राजीनामा दिला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या संपूर्ण घटनेबद्दल तीव्र नाराजी व खेद व्यक्त केला होता.
आणखी एक गोष्ट म्हणजे या संपूर्ण घटनेत सॅन्डपेपरची चर्चा होती. पण बॅनक्रॉफ्टच्या खिशात जे काही होते ते म्हणजे पिवळी टेप जी प्रत्येक क्रिकेटपटूच्या किटमध्ये असते. बॅटची ग्रीप चिटकविण्यासाठी या पट्टीचा उपयोग होतो. तथापि, हा एकच प्रयोग नाही. या टेपवर वाळू चिकटवून, ती बॉलवर घासली जाते जेणेकरून बॉलची एक बाजू खराब होईल. संपूर्ण प्रकरणात त्या टेपला सॅन्डपेपरचे नाव देण्यात आले. कारण टेप प्रत्येक क्रिकेटरच्या किटमध्ये असते आणि प्रत्येक वेळी टेपचे नाव आल्यानंतर त्यांना बऱ्याच ‘अडचणींना’ सामोरे जावे लागत होते.
हा संपूर्ण प्रकार “रिव्हर्स स्विंग” गोलंदाजीसाठी करण्यात आला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुमारे २५-२७ षटकांच्या आसपास रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करायला सुरुवात केली.
रिव्हर्स स्विंग –
वर्ष १९९२, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एक मालिका खेळली जात होती. लॉर्ड्स मैदानावर एक सामना होणार होता. इंग्लंडच्या संघाने ३-० अशी आघाडी घेतली होती. खराब हवामानामुळे दुसर्या दिवशी हा सामना खेळला गेला. इंग्लंडला २०५ धावांचे लक्ष्य होते. ५ विकेट गमावून १४० धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी फक्त ६५ धावांची आवश्यकता होती. अचानक मैदानावरील पंच केन पाल्मर (Ken Palmer)आणि जॉन हॅम्पशायरने (John Hampshire) बऱ्याच वेळेपर्यंत चेंडूकडे पहिले आणि त्यानंतर चेंडूला बदली करण्याचे आदेश दिले. यानंतर वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनूसने (Waqar Younis) इंग्लंडचे उर्वरित फलंदाज ६१ धावांवर बाद केले. शेवटचे ४ फलंदाज १० धावा करुन बाद झाले.
त्यावेळी चेंडू सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. पंचांच्या खोलीत एक बैठक झाली आणि सर्वांनी चेंडूच्या पृष्ठभागाकडे निरखून पाहिले आणि सर्व पंचानी असा निष्कर्ष काढला की अंगठाच्या नखाने किंवा कोणत्याही धातूने बॉल कुरतवडविण्यात आला आहे. सर्वत्र असे म्हटले जात होते की पाकिस्तानी गोलंदाज चेंडू सोबत छेडछाड करतात.
पण वकार युनूस म्हणला होता,”मला याची पर्वा नाही की कोण काय बोलतो. जेव्हा-जेव्हा आमचा संघ जिंकतो, तेव्हा-तेव्हा प्रत्येकजण आमच्या बद्दल असंच काहीतरी बोलतो”
“क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू सोबत छेडछाड केल्यामुळे चेंडू बदलला गेला हे दर्शविण्याचा प्रयत्न केला जात होता. वृत्तपत्रांत येणाऱ्या अशा बातम्या पाकिस्तानवर डाग लावत आहेत आणि देशाच्या क्रिकेटला अपमानित केले आहे.” असे त्यावेळी पाकिस्तानचे मॅनेजर म्हणाले.
या वक्तव्याचा इंग्लंडचे माजी कर्णधार एलन लँब (Allan Lamb) यांना राग आला. तीन दिवसांनंतर डेली मिरर वृत्तपत्राच्या पहिल्या पानाच्या एक स्टोरी आली होती. तिचे शिर्षक होते, “How Pakistan Cheat at cricket.” अर्थातच ही स्टोरी लॅंब यांच्यामुळेच आले होते.
याचा त्रास लँब यांना सहन करावा लागला. त्यांना इंग्लंडकडून परत कधीच खेळण्यास संधी मिळाली नाही. कारण तो काळ असा होता की थेट पत्रकारांशी बोलण म्हणजे मोठं पाप होतं. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांनी चार वर्षे एकही मालिका खेळली नाही. लँब यांच्यावर सरफ़राज़ने खटला दाखल केला, जो नंतर मागे घेण्यात आला कारण सरफ़राज़ म्हणाला- “तिथे ९ तरुण मुली ज्युरीमध्ये बसल्या होत्या, ज्यांना क्रिकेट बॉल आणि फुटबॉलमधील फरकदेखील माहित नव्हता.”
आजपर्यंत तो चेंडू कधीही कुणीही पाहिला नाही तसेच त्या विषयाशी संबंधित कोणताही अहवाल समोर आला नाही. याच सामन्यातील तिसरे पंच ओस्लियर यांनी १९९३ मध्ये पंचगिरी सोडली. ते असे म्हणाले होते की या सामन्याने त्यांना सेवानिवृत्तीचे वय बदलण्यास भाग पाडले गेले होते.
या संपूर्ण घटनेच्या फक्त एक वर्ष आधी, वसीम अक्रम, वकार युनूस आणि अकीब जावेद (Aaqib Javed) लँकशायर, सरे आणि हॅम्पशायर या तीन वेगवेगळ्या कौउंटी संघांकडून खेळत होते. वकार युनूसने १९९१ मध्ये ग्लॉस्टरशायरविरुद्ध रिव्हर्स स्विंगचे भयंकर स्पेल टाकले होते. एका सामन्यात ग्लॉस्टरशायर संघ एकही विकेट न गमावता १०५ धावांवर खेळत होता आणि थोड्याच वेळात त्यांची धावसंख्या १६० धावांत ६ गडी अशी बाद झाली होती.
वकार युनूसने ४ बळी घेतले होते. तेव्हा लोक म्हणत होते की तो खेळपट्टीच्या या कोपऱ्यातून तो चेंडू स्विंग करीत होता. चेंडू छेडाछेडीच्या खर्या अफवांंची चर्चा होण्याची ही पहिली वेळ होती. १९९२ मध्ये जे घडले त्याचा हा परिणाम होता. या स्विंगला कॉन्ट्रास्ट स्विंग (Contrast Swing) असे म्हणतात. कारण येथे चेंडू कोणत्या दिशेला स्विंग असावा, चेंडू त्याच्या उलट दिशेने जात होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी बोटांची नख वाढवली होती. त्यांच्या खिशात बाटल्यांच्या धातूची आवरण (टोप्या) सापडल्या होत्या.
ही क्रिकेटच्या लोकप्रिय संस्कृतीत रिव्हर्स स्विंगची सुरुवात झाली. रिव्हर्स स्विंग कशा पद्धतीने करू शकतो याचा अभ्यास सर्व गोलंदाजांनी सुरु केला. पण याची सुरुवात कुठून झाली आणि जगाला कसं समजल…?
१९६९-१९८४ दरम्यान एक उंच गोलंदाज पाकिस्तानकडून खेळायचा त्याच नावं सरफराज नवाज (Sarfraz Nawaz). लाहोरमध्ये वडिलांच्या बांधकाम कंपनीत काम करणारा सरफराज मॅट्रिकपूर्वी कधीच क्रिकेट खेळला नव्हता. ६५ च्या युद्धाच्या वेळी, त्याच्या वडिलांच्या कंपनीचे बहुतेक सिविल करार अडकले होते. येथे काम करणारे कामगार क्रिकेट खेळायचे आणि त्यांच्याबरोबर सरफराजही खेळू लागला.
६ फूट ४ इंच उंच सरफराजला माहित झाले की तो क्रिकेट योग्य प्रकारे खेळतो. लवकरच त्याची लाहोरच्या शासकीय महाविद्यालयासाठी नियमित क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. सरफराजने येथे सर्व प्रकारच्या चेंडूंनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जुन्या चेंडूंसह गोलंदाजी करताना, त्याला समजले की रिव्हर्स स्विंग म्हणजे काय. त्याने एक जुना चेंडू घेतला आणि त्याची एक बाजू चमकावली. आता त्याने जेव्हा चेंडू फेकला तेव्हा चेंडू चमकावलेल्या दिशेने गेला. हे इतर स्विंगमध्ये घडत नव्हते. हा तो काळ होता जेव्हा पाकिस्तानमध्ये रिव्हर्स स्विंगने गोलंदाजाने पाऊल टाकले होते. हा प्रकार त्याने सलीम मीर यालाही सांगितला. या दोघांनीही रिव्हर्स स्विंगची कला गुप्त ठेवली.
१९७६ मध्ये वेस्ट इंडीज दौर्यादरम्यान पाकिस्तान संघात सामील झाल्यानंतर, आणखी एका पाकिस्तानी गोलंदाजाने त्याला विचारले की, तू जुना चेंडू स्विंग करतोस परंतु मला का नाही जमत.? सरफराजने सांगितले की, तो सामन्यात नव्हे तर नेटमध्ये समजावेन. दुसर्या दिवशी त्या गोलंदाजाला सरफ़राज़ने युक्ती सांगितली आणि हा तो प्रसंग होता जेव्हा एका पिढीकडून रिव्हर्स स्विंगची कला दुसऱ्या पिढीकडे आली. त्या गोलंदाजाचे नाव इम्रान खान असे होते, जो पुढे पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनला आणि पाकिस्तान क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेलं.
इम्रानने १९८२ मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रिव्हर्स स्विंग गोलंदाजी केली होती. भारत २८३ धावांचा पाठलाग करत होता. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) भागीदारी रचत होते. जवळजवळ ४० षटके चेंडू जुना झाला होता आणि इम्रान खानला गोलंदाजीसाठी आणले गेले. पुढच्या ३५ बॉलमध्ये भारताने ८ धावांमध्ये ५ विकेट गमावल्या होत्या.
गावसकर, ज्यांना त्रिफळाचित करणे म्हणजे मोठी गोष्ट होती, त्यादिवशी त्यांना इम्रानचा चेंडू समाजालाच नाही आणि यष्ट्या उध्वस्थ झाल्या. तर गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) बाहेर जाणारा चेंडू सोडत होते आणि अचानक एक चेंडू आत आला आणि त्रिफळाचित झाले. त्या दिवशी इम्रानने ६० धावा देऊन ८ बळी घेतले होते. विशेष म्हणजे यात ५ त्रिफळाचित आणि 2 पायचीत होते.
वाचनीय लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
१०व्या नंबरवर फलंदाजीला येत एकट्याच्या जीवावर भारताला दिवसा चांदण्या दाखवणारा अवलिया क्रिकेटर
आदल्या दिवशी एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू फायनलच्या सकाळी हॉटेलवरुन झाला होता गायब