पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासीर अराफातने बऱ्याच जुन्या गोष्टींचे खुलासे केले आहेत. आता त्याने सांगितले की, त्याने आपल्या लग्नासाठी अनेक क्रिकेट खेळाडूंना आमंत्रित केले होते, परंतु माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीशिवाय कोणीही त्याच्या विवाहास गेले नव्हते. तसेच यासीरने सांगितले की अशा प्रकारे शाहरुख खानकडून त्याला कोलकत्ता नाईट रायडर्सकडून खेळण्याची ऑफर मिळाली होती.
त्याने सांगितले की, “सौरव गांगुली हा एक अतिशय विनम्र माणूस आहे. मला कल्पना नाही की ही घटना त्यांच्या चाहत्यांना माहिती आहे किंवा नाही. पण गांगुली माझ्या विवाहात सामील झाला होता. मी अनेक क्रिकेट खेळाडूंना आमंत्रित केले होते, परंतु प्रत्येक जण काही आला नाही. मी त्यावेळी सौरव गांगुलीला विनंती केली आणि ते आले. त्यावेळी ते व्यस्त होते, तरीही ते माझ्या लग्नाला हजेरी लावायला आले.”
अराफातने पुढे सांगितले की, त्याला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायजीचे मालक शाहरुख खान यांनी ऑफर दिली होती. “आयपीएलचा पहिला मोसम मी खेळू शकलो नव्हतो. दुसऱ्या मोसमाआधी जेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा कोलकाता संघातर्फे कुणीतरी माझ्याकडे आले आणि मला सांगितले की माझ्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहोत. पुढे तो म्हणाला की, शाहरुख माझ्या आकड्यांवर नजर ठेवून आहे. मला त्यावेळी वाटलं कुणीतरी माझ्यासोबत मस्करी करतय. त्या व्यक्तीने मला कार्ड दिले परंतु मी त्यावर माझी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.”
“त्यानंतर मला भारतातून फोन आला की, मी अजून संपर्क करायचा पर्यंत का केला नाही. तेव्हा मला विश्वास पटला की ही मस्करी नव्हती, मला कळलं की केकेआर तर्फे मला तीन वर्षे कराराची ऑफर आहे. दुसऱ्या दिवशी शाहरुखने मला फोन केला आणि म्हणाला तुमचं स्वागत आहे, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या संघाकडून खेळावं.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ फायद्यासाठी सिराजऐवजी अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी द्या, माजी निवडकर्त्यांचा सल्ला
कोरोना इफेक्ट! डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिसने घेतली ‘या’ मोठ्या लीगमधून माघार