भारतीय संघ बुधवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीला रवाना झाला आहे. या दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी(१२ नोव्हेंबर) या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी १७ जणांचा संघ घोषित केला. या संघात वेगवान गोलंदाज सीन ऍबॉटलाही संधी देण्यात आली आहे. सीन ऍबॉट हे नाव अनेकांच्या परिचयाचे आहे. त्यामागे कारणही तसेच आहे.
६ वर्षांपूर्वी क्रिकेट जगताला धक्का देणारी एक घटना घडली. ती घटना म्हणजे ऑस्ट्रेलियान क्रिकेटपटू फिल ह्यूजेसचे निधन. त्याचे डोक्याला चेंडू लागल्याने निधन झाले होते. त्याला ज्या गोलंदाजाचा चेंडू लागला तो गोलंदाज म्हणजे सीन ऍबॉट.
सीन ऍबॉट होता निराशेत –
२०१४ मध्ये शेफील्ड शील्ड स्पर्धेत सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर फलंदाजी करत असलेल्या २५ वर्षीय ह्यूजेसला एबॉटने टाकलेला एक चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. फलंदाजी दरम्यान ह्यूजेसने हेल्मेट परिधान केले होते पण चेंडू मानेच्या जवळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी तो जेव्हा जमीनीवर कोसळला तेव्हा ऍबॉट लगेचच त्याच्या जवळ गेला होता. त्याने जमिनीवर कोसळलेल्या ह्यूजेसला त्याच्या हातांनी सावरलेही होते. तसेच ह्यूजेसला मैदानातून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत ऍबॉट मैदानावरच होता.
या दुखापतीनंतर ह्यूजेसला लगेचच स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आले होते, तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ह्यूजेस हॉस्पिटलमध्ये कोमात असताना ऍबॉट त्याला भेटण्यासाठीही गेला होता. पण अखेर दुखापत झाल्याच्या तीन दिवसांनंतर २७ नोव्हेंबरला ह्यूजेसने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेचा ऍबॉटला चांगलाच धक्का बसला होता. त्याच्यासाठी या घटनेनंतरचे काही दिवस कठीण गेले होते. त्यावेळी ऍबॉट केवळ २२ वर्षांचा होता. त्याने जो चेंडू ह्यूजेसला लागला होता, त्या चेंडूवर त्याने ‘आय ऍम सॉरी फिल’ असे लिहिले आहे.
पण या घटनेनंतर ऍबॉट संघसहकारी, कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने तो यातून बाहेर आला आणि त्याने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली. काही माध्यमांतील वृत्तानुसार, या वेदनादायी घटनेनंतर ह्यूजेसचा जवळचा संघसहकारी मायकल क्लार्क आणि ह्यूजेसची बहीणही ऍबॉटला भेटायला गेले होते.
हळू हळू ऍबॉटने या घटनेतून सावरत क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आणि आज तो ऑस्ट्रेलियाच्या संघातही निवडला गेला आहे.
भारताविरुद्ध करु शकतो कसोटी पदार्पण –
ऍबॉटने याआधी ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि टी२०मध्ये पदार्पण केले आहे. पण आता त्याला कसोटीतही पदार्पणाची संधी मिळणार आहे. भारताविरुद्ध १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील सामन्यांमध्ये ऍबॉटला अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली तर त्याचे कसोटीत पदार्पण होईल.
ह्यूजच्या ६ व्या पुण्यतिथीच्या दिवशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रंगणार पहिला वनडे सामना –
एवढेच नाही तर ऍबॉटचा भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही समावेश आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरला वनडे मालिकेपासूनच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे २७ नोव्हेंबरला ह्यूजेसची ६ वी पुण्यतिथी आहे. त्याचदिवशी पहिला वनडे सामना असून तो सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच होत आहे. त्यामुळे या सामन्याला एक वेगळेच महत्त्व आले आहे. तसेच या वनडे सामन्यात ऍबॉटला खेळण्याचीही संधी मिळू शकते.
ह्यूजेसला भारताविरुद्ध खेळण्याची होती संधी
ह्युजेसचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याचं वय हे २५ वर्ष व ३६२ दिवस होतं. तेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून बऱ्यापैकी कामगिरी केली होती. त्याचदरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जाणार होता. भारताविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्याची मोठी संधी ह्युजेससाठी चालून आली होती. परंतू त्याच्या आकस्मिक निधनानंतर या मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात खेळाडू खांद्याला काळी पट्टी बांधून सहभागी झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग- भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
-मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
-भारताविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर