सध्या दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. चार दिवसीय फ्रॅंचाईजी क्रिकेट स्पर्धेमध्ये शनिवारी (२० नोव्हेंबर) एक अविश्वसनीय कामगिरी झालेली पाहायला मिळाली. अष्टपैलू सीन व्हाईटहेडने सर्वकालीन महान गोलंदाज जिम लेकर व अनिल कुंबळे यांची बरोबरी करत एकाच डावात विरोधी संघाचे सर्वच्या सर्व १० गडी बाद करण्याची किमया केली. विशेष म्हणजे त्याने दोन्ही डावात मिळून फलंदाजी करताना १११ धावा देखील केल्या. व्हाईटहेडने बांगलादेशमध्ये झालेल्या २०१६ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते.
विश्वविक्रमाची केली बरोबरी
एसडब्लूडी प्रथमश्रेणी स्पर्धेत साऊथ वेस्टनर्स आणि ईस्टनर्स या संघांमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात साऊथ वेस्टनर्ससाठी खेळताना व्हाईटहेडने अफलातून कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना पहिल्या डावात ६४ धावा देऊन पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ४५ धावांचे योगदान दिले. अखेरच्या डावात ईस्टनर्स संघाला विजयासाठी १८६ धावांची गरज होती. मात्र, डावखुरा फिरकीपटू असलेल्या व्हाईटहेडने विश्वविक्रमी कामगिरी करत अवघ्या ३६ धावा देऊन सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद करत संघाला विजय मिळवून दिला.
कुंबळे आणि लेकर यांनी केली होती अशी कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम एकाच डावात प्रतिस्पर्धी संघाचे सर्व दहा फलंदाज बाद करण्याची कामगिरी इंग्लंडचे महान फिरकीपटू जिम लेकर यांनी केली होती. लेकर यांनी १९५६ च्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅंचेस्टर येथे ही कामगिरी केली होती. त्यांनी त्या सामन्यात १९ बळी टिपले होते. त्यानंतर अशी कामगिरी होण्यासाठी १९९९ साल उजाडावे लागले. भारताचे दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्ध दिल्ली कसोटीत ही कामगिरी करून दाखवली.