भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना येत्या ४ मार्चपासून अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिसरा सामना देखील याच मैदानावर खेळवला गेला होता, ज्यात भारतीय संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर त्याआधी चेन्नई येथे झालेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात इंग्लडने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय प्राप्त केला होता. त्यामुळे मालिकेत यजमान संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे.
मात्र मालिकेत आघाडीवर असूनही चौथा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना अनिर्णीत राखणे अथवा सामन्यात विजय मिळवणे, आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या सामन्यात भारतीय संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरेल. परंतु सामन्याआधी त्यांच्यासमोर संघनिवडीची डोकेदुखी उभी ठाकली आहे.
काय आहेत पर्याय?
चौथ्या सामन्यात भारतीय संघ एक बदल करणार हे निश्चित आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतल्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यापैकी एकाचा समावेश केल्या जाऊ शकतो. सिराजने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले होते, त्यामुळे तो या स्थानाचा एक प्रमुख दावेदार आहे. तर अनुभव आणि भारतीय खेळपट्ट्यांवरील चांगली कामगिरी या गोष्टींमुळे उमेश यादवला देखील पसंती दिली जाऊ शकते.
याव्यतिरिक्त चौथ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी ही फलंदाजांना पोषक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाॅशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवला संधी देण्याचा मोह देखील भारतीय संघ व्यवस्थापनाला होऊ शकतो. गोलंदाजांना खेळपट्टीकडून फारशी मदत होत नसतानाही फलंदाजांना आपल्या मनगटी फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यात कुलदीप माहीर आहे. त्यामुळे त्याच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो.
याशिवाय, जर वाॅशिंग्टन सुंदरला संघाबाहेर करायचे असल्यास त्याच्या जागी हार्दिक पंड्याचा अष्टपैलू म्हणून देखील समावेश केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत हार्दिक आपल्या मध्यमगती गोलंदाजीने इशांत शर्मासह वेगवान गोलंदाजीचे आक्रमण सांभाळेल. तर बुमराहच्या जागी कुलदीपला यादवला संधी देऊन तीन विशेषज्ञ फिरकी गोलंदाज खेळवण्याची चाल भारतीय संघ खेळेल. मात्र यापैकी नेमका काय निर्णय होणार, हे सामन्याच्या दिवशीच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहने का घेतली माघार? खरे कारण आले समोर
आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ही आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन
वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीज आधी युवी आणि सचिन जपतायेत स्वतःची सेफ्टी, पाहा भन्नाट फोटो






