पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने टी-२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावे केला. टी-२० सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून १०० बळी घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला.
बुमराहने २३ वर्षे आणि ५७ दिवस हे वय असतांना टी-२० क्रिकेटमधील आपला शंभरावा बळी घेतला होता. मात्र आता शाहीन आफ्रिदीने २० वर्षे आणि ३२६ दिवस हे वय असतानाच आपल्या टी-२० कारकिर्दीतील १०० बळीचा टप्पा गाठला. त्यामुळे आता तो टी-२० क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा सर्वात युवा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
मुजीब उर रेहमान अव्वलस्थानी
मात्र सगळ्या प्रकारच्या गोलंदाजांचा विचार करता सर्वात कमी वयात टी-२० क्रिकेटमध्ये १०० बळी घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमानच्या नावे आहे. त्याने १८ वर्षे आणि २७१ दिवस असे वय असतानाच ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर या यादीत अफगाणिस्तानच्याच रशिद खानचा क्रमांक लागतो. त्याने १८ वर्षे आणि ३६० दिवस हे वय असताना टी-२० सामन्यातील आपल्या १००वा बळी घेतला होता.
पीएसएलच्या सामन्यात केले १०० बळी पूर्ण
शाहीन आफ्रिदीने हा कारनामा पाकिस्तान सुपर लीगच्या सातव्या सामन्यात खेळतांना केला. या सामन्यात लाहोर कलंदर्सच्या संघाकडून खेळताना त्याने ४ षटकात २९ धावा देत २ गडी बाद केले. मात्र त्याच्या संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
प्रतिस्पर्धी मुलतान सुलतान्सच्या संघाने लाहोरला ७ गडी राखून सहज पराभूत केले. लाहोर कलंदर्सने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य मुलतानच्या संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात १६.२ षटकातच पूर्ण केले. मुलतानच्या संघाकडून ४९ चेंडूत ७६ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार मोहम्मद रिझवानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
क्रिकेट ब्रेकिंग! भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर
मराठी भाषा गौरव दिन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन फलंदाज
INDvsENG: कोविड-१९ चा वनडे मालिकेला फटका! पुणे नव्हे तर महाराष्ट्राबाहेर होणार आयोजन?





