काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आपला राजीनामा दिला आहे. तर, निवडसमितीलाही त्यांच्या पदावरून पदमुक्त करण्यात आले. निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची नियुक्ती केली गेली आहे. त्या पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून आफ्रिदीने अनेक मोठे निर्णय घेत सर्वांना चकित केले.
निवड समिती अध्यक्ष बनताच आफ्रिदीने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. यामध्ये तीन एकोणीस वर्षाखालील संघातील खेळाडूंना संधी दिली. त्यानंतर आता टी20 क्रिकेटबाबतही आफ्रिदी मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, आफ्रिदीने जाहीर केले आहे की, 135 पेक्षा कमी स्ट्राइक रेट असलेल्या खेळाडूंना टी20 संघात जागा मिळणार नाही. त्याच्या या वक्तव्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडालेली आहे. कारण, सध्या पाकिस्तान संघात शादाब खान, मोहम्मद नवाझ व आसिफ अली हे तिघेच या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात.
हा निर्णय अंमलात आणला गेला तर, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम व मागील दोन वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना संघातून बाहेर केले जाऊ शकते. काहींनी त्याच्या या वक्तव्यावर टीका केली असून, संघाला सर्व प्रकारच्या फलंदाजांची गरज असल्याचे म्हटले आहे.
आफ्रिदी 2024 टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने आत्ताच संघ बांधणी करत असल्याचे सांगितले जाते. तसेच निवड समितीचे पूर्णवेळ अध्यक्षपदही त्याला दिले जाऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात तो कशाप्रकारे निर्णय घेतो याकडे सर्वांची नजर असेल.
(Shahid Afridi 135 Strike Rate Comment Worry For Babar And Rizwan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”, श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल