क्रिकेटजगताला पाकिस्तानने अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज दिले आहेत, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही वर्षात त्यांची ही परंपरा थांबते की काय, असे वाटत होते. पण आता एका नव्या खेळाडूने पाकिस्तानी चाहते आणि संघाची आशा जागृत केली आहे. आपण बोलत आहोत, पाकिस्तानच्या 21 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीबद्दल, ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिदीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. याबरोबर अनेक मोठे विक्रम करून तो ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ हे दोन्ही पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
जमैकाच्या किंग्स्टन येथील, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. कसोटी कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पण पाचव्या दिवशीही त्याने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात आपला प्रभाव सोडला आणि यावेळी त्याने 4 बळी घेतले. त्याच्या कामगिरीच बळावर 329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडीज संघाला पाकिस्तानने 212 धावांवरच गुंडाळले आणि 109 धावांनी सामना जिंकला. यासोबतच मालिका बरोबरीत देखील सोडवली. आफ्रिदीने यादरम्यान बरेचसे खास विक्रमही केले.
शाहीन आफ्रिदीने केली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात 17.3 षटकांत 51 धावा देत 6 बळी घेतले होते. तर वेस्ट इंडिज संघाच्या दुसऱ्या डावात त्याने 17.2 षटकांत 43 धावा देत 4 बळी घेतले होते. अशाप्रकारे पूर्ण सामन्यात आफ्रिदीने 94 धावा देऊन 10 बळी घेतले. या दरम्यान, त्याने दोन्ही डावांत एकूण 12 निर्धाव षटके टाकली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
शाहीन आफ्रिदीचा सर्वात मोठा विक्रम
शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात 8 बळी घेतले होते. त्याने त्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये 4-4 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या. यासह, आफ्रिदीने या कसोटी मालिकेत एकूण 18 बळी मिळवले आणि आता तो पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.
वसीम अक्रमचे विक्रमही मोडले
शाहीन आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात 6 विकेट घेत वसीम अक्रमचा 21 वर्षांचा जुना विक्रमही मोडला. वेस्ट इंडीजच्या भूमीवर एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा पाकिस्तानी गोलंदाजांचा हा विक्रम होता. आता आफ्रिदीने वसीम अक्रमच्या आणखी एका विक्रमाकडे आपली पावले टाकली आहेत. वेस्टइंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेत आफ्रिदीने अजून एक किर्तीमान केला आहे. तो एका कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारा पाकिस्तानचा दुसरा डावखुरा गोलंदाज बनला आहे. आतापर्यंत हा विक्रम फक्त वसीम अक्रमच्या नावावर होता, ज्यांनी 5 वेळा हा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘शाहीन, १९ वर्षांचा आहे तो, बिचाऱ्याला डिवचू नकोस’; पाकिस्तानी यष्टीरक्षकाचा आफ्रिदीला मजेशीर सल्ला
लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा