विक्रम आणि क्रिकेटचे नातंच वेगळं आहे. कारण अनेक दशकांपासून खेळाडू अनेक विक्रम बनवत आले आहेत. पुढे जाऊन हे विक्रम मोडलेही जातात. परंतु मैदानावर काही खेळाडूंनी असेही विक्रम बनविले आहेत, ज्यांना मोडणे आजच्या क्रिकेटपटूंसाठीही सोपे नाही. मग तो फलंदाजीचा विक्रम असो किंवा मग गोलंदाजीचा.
असाच एक विक्रम श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा एरंगाने (Shaminda Eranga) आपल्या नावावर केला आहे, जो आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला मोडता आला नाही.
शमिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील सामन्याच्या पहिल्या षटकात विकेट घेतली आहे. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. शमिंडाने सर्वप्रथम वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना पहिल्या षटकात विकेट घेतली होती. खरंतर २०११ मध्ये त्याने हंबनटोटा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळताना ब्रॅड हॅडिनची (Brad Haddin) विकेट घेतली होती. ही त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट होती.
शमिंडाने त्याच वर्षी म्हणजेच २०११मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेण्याचा कारनामा केला होता. त्याने कोलंबो येथे खेळताना शेन वॉटसनला (Shane Watson) बाद करत कसोटी क्रिकेटमध्येही पहिल्या षटकात विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लहान क्रिकेट प्रकार म्हणजेच टी२० क्रिकेटमध्येही त्याने पहिल्या षटकात विकेट घेत त्याने हा विक्रम केला. त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला (Gautam Gambhir) बाद केले होते. त्यामुळे शमिंडा क्रिकेट जगतातील असा पहिला गोलंदाज ठरला, ज्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पहिल्या षटकात विरोधी संघाच्या फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखविला आहे.
शमिंडाने आपल्या कारकिर्दीत श्रीलंकेकडून एकूण १९ कसोटी सामने, १९ वनडे सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५७ विकेट्स, वनडेत २१ विकेट् आणि टी२०त ३ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने माझे आयुष्य बदलले’, पहा कोण म्हणतंय हे…