---Advertisement---

दिल्ली संघात अक्षर पटेलची अल्प कालावधीसाठी ‘हा’ खेळाडू घेणार जागा; श्रेयस अय्यरच्या बदली खेळाडूचीही घोषणा

---Advertisement---
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होऊन आता आठवडा उलटला आहे. पण हा हंगाम सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठे धक्के बसले. त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या संपूर्ण आयपीएल हंगामातूनच बाहेर पडला. तर अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलचा अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता दिल्लीने अक्षर पटेलऐवजी अल्प कालावधीसाठी तर अय्यरसाठी पूर्ण कालावधीसाठी बदली खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

अक्षर पटेलऐवजी शम्स मुलानीला अल्प कालावधीसाठी संधी
अक्षर आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने काही दिवस दिल्ली संघासाठी अनुपलब्ध असणार आहे. तो सध्या आयसोलेशनमध्ये असून उपचार घेत आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अल्प कालावधीसाठी मुंबईच्या शम्स मुलानीला दिल्ली कॅपिटल्सने संघात ‘कोविड-१९ रिप्लेसमेंट’ म्हणून संधी दिली आहे.

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मुलानीला आयपीएलच्या बदली खेळाडूसाठी असलेल्या नियमानुसार दिल्लीने संघात संधी दिली आहे. याबद्दल दिल्लीने प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की ‘६.१ (c) नियमानुसार मूळ संघात असलेला खेळाडूला संघाच्या जैव-सुरक्षित वातावरणात पुन्हा येण्याची परवानगी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत अल्प कालावधीसाठी बदली खेळाडू घेण्याची फ्रँचायझींना परवानगी आहे. त्यामुळे केवळ अक्षर बरा होईपर्यंत आणि संघात जोडला जाईपर्यंत मुलानी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होईल.’

प्रसिद्धीपत्रकात पुढे दिले आहे की ‘मुलानीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने १० प्रथम श्रेणी, ३० अ दर्जाचे सामने आणि २५ टी२० सामने खेळले आहेत. तसेच यंदा तो पहिल्यांदाच आयपीएलचा भाग होत आहे. तसेच ज्यावेळी मुलानी दिल्ली कॅपिटल्समधून बाहेर पडेल (अक्षर परत आल्यानंतर), त्यानंतर त्याला या हंगामात दुसऱ्या कोणत्याही संघाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.’

श्रेयस अय्यर ऐवजी अनिरुद्ध जोशीला संधी
मागील महिन्यात इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर काहीदिवसांपूर्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे त्याला या आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागले. त्याच्याऐवजी रिषभ पंत दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे.

तसेच दिल्लीने या हंगामासाठी त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. कर्नाटकच्या अनिरुद्ध जोशीला श्रेयस ऐवजी दिल्ली संघात संधी मिळाली आहे. तो याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे.

त्याच्याबद्दल दिल्लीने प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की ‘जोशी, मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि ऑफ-स्पिनरही आहे. दिल्ली कॅपिटल्स त्याचा तिसरा संघ आहे. तो यापूर्वी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आत्तापर्यंत १७ अ दर्जाचे सामने आणि २२ टी२० सामने खेळले आहेत.’

दिल्लीची संमिश्र सुरुवात
आयपीएल २०२१ मध्ये दिल्लीची संमिश्र सुरुवात झाली आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात दिल्लीला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

भन्नाट! स्टॉयनिसला बाद करताना बटलरने पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ

सेहवागचा हिंदी गाण्यातून सनरायझर्सला छुपा संदेश, केले ‘हे’ ट्विट

वामीकाबद्दल बोलताना ‘बाप’माणूस विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, ‘ती जेव्हा हसते तेव्हा…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---