भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याने नुकतेच देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते, ज्यामुळे तो चर्चेत आला. काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा वर उचलल्यानंतर सचिनसह भारतातील अनेक सेलिब्रेटींनी बाहेरच्या लोकांनी भारताच्या अंतर्गत मुद्याबाबत भाष्य करु नये, असे म्हटले होते.
यानंतर सचिनच्या या ट्विटला खुप प्रतिक्रिया आल्या. यातील अनेक प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. त्याला या ट्विटमुळे चाहत्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की सचिनने वेगळ्या क्षेत्राबद्दल मत व्यक्त करताना सावधगिरी बाळगायला हवी.
आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘अनेक भारतीय सेलिब्रेटींनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मी सचिनला सल्ला देईल की दुसऱ्या कोणत्याही क्षेत्राबद्दल बोलताना सावधगिरी बाळग.’
सचिनचे ट्विट
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर अमेरिकन पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांसारख्या भारताबाहेरील सेलिब्रेटींनीही ट्विट केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. याच दरम्यान, सचिन तेंडुलकरने ट्विट केले की ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक प्रेक्षक असू शकतात परंतु, यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत देश माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या.’
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants.
Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
सचिनच नाही तर अनेक सेलिब्रेटींनीही केले ट्विट
केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाही तर भारतरत्न लता मंगेशकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अक्षय कुमार अशा अनेक सेलिब्रेटींनी ‘इंडिया टूगेदर’ (#IndiaTogether) हा हॅशटॅग वापरत ट्विट केले. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेटपटूंसह अनेक सेलिब्रेटींवर सोशल मीडियातून नाराजी व्यक्त होत आहे.
राज ठाकरेंनीही सचिनला यात न पडण्यास सुचवले
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील म्हटले आहे की सचित तेंडुलकर आणि लता मंगेशकर सारख्या दिग्गजांनी या प्रकरणात नव्हते पडायला हवे.
ते म्हणाले, ‘ते (तेंडुलकर आणि लता मंगेशकर) त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. ती साधी माणसं आहेत. त्यांना या हॅशटॅगद्वारे ट्विट करण्यास सांगायला नव्हतं पाहिजे. सरकारने त्यांना ज्या गोष्टींचे ट्विट करण्यास सांगितले त्यांनी ते ट्विट केले, आणि आता त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
येत्या २० फेब्रुवारीपासून सुरुवात होणार विजय हजारे ट्रॉफीला; ‘या’ ६ प्रमुख ठिकाणी होणार स्पर्धा
Video : …आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले
“तेव्हा जो रुटने मला विचारले होते त्याला कोणताच आयपीएल संघ का निवडत नाही”